कशेडी घाटातील दरडीमुळे महामार्ग ठप्प; अडकलेल्या प्रवाशांचा प्रशासनावर गंभीर आरोप

खेड | प्रतिनिधी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात मध्यरात्री सुमारे दोनच्या दरम्यान मोठी दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरडीमुळे डोंगरातील मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि झाडे रस्त्यावर कोसळल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
पुण्याहून रत्नागिरी जिल्ह्यातील लांजाकडे निघालेल्या एका खासगी वाहनातील १४ प्रवासी रात्री तीन वाजल्यापासून महामार्गावर अडकून पडले आहेत. या प्रवाशांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रात्री दोनच्या सुमारास घटना घडूनही सकाळी आठ वाजल्यानंतरच दरड हटवण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
घटनास्थळी उपलब्ध असलेली यंत्रसामग्री अपुरी असल्याने दरड हटविण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. सध्याची परिस्थिती पाहता सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंतही महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होईल की नाही, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पहाटेपासून महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना पिण्याचे पाणी, चहा तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. काही ठिकाणी अत्यावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री होत असल्याचा आरोपही प्रवाशांनी केला. २० रुपयांची पाण्याची बाटली २५ रुपयांना, ३० रुपयांचे कांदा पोहे ५० रुपयांना आणि १० रुपयांचा चहा २० रुपयांना विकला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
अडचणीच्या काळात स्थानिक प्रशासन व संबंधित यंत्रणांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत व्यक्त करत, महामार्गावर अडकलेल्या हजारो प्रवाशांना तातडीने अन्न, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.