सिंधुदुर्गच्या जैवविविधतेत मानाचा तुरा
सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होडावडे गावात एका दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण निसर्गचमत्काराची पुनरावृत्ती झाली आहे. गावातील निसर्गप्रेमी मंगेश माणगावकर यांच्या परसबागेत रात्रीच्या अंधारात चमकणाऱ्या अळंबीचे सलग चौथ्या वर्षी पुनरागमन झाले आहे. या दुर्मिळ अळंबीची अधिकृत नोंद राष्ट्रीय पातळीवर घेतली गेल्याने होडावडे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या चमकणाऱ्या अळंबीचे शास्त्रीय नाव ‘मायसेना क्लोरोफॉस’ (Mycena chlorophos) असे आहे. विशेष म्हणजे, या अळंबीच्या अस्तित्वाची अधिकृत नोंद २६ एप्रिल २०२४ रोजी ‘जर्नल ऑफ थ्रेटंड टॅक्सा’ (Journal of Threatened Taxa) या नामांकित आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिकेत प्रसिद्ध झाली आहे.
महाराष्ट्रातील पहिलीच वैशिष्ट्यपूर्ण नोंद
यापूर्वी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी राखीव संवर्धन क्षेत्रात ‘बायोल्युमिनेसेन्स’ म्हणजेच प्रकाशमान बुरशीची नोंद झाली होती. मात्र, होडावडे येथे सापडलेल्या विशिष्ट ‘मायसेना क्लोरोफॉस’ या प्रजातीच्या चमकणाऱ्या आळंबीची ही महाराष्ट्रातील पहिलीच नोंद ठरली आहे. केरळ आणि गोवा या राज्यांनंतर अशी अळंबी आढळणारे महाराष्ट्र हे भारतातील तिसरे राज्य बनले आहे. या शोधामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समृद्ध जैवविविधतेमध्ये मोलाची भर पडली आहे.
*माणगावकरांची परसबाग ठरतेय जैवविविधतेचे केंद्र*
मंगेश माणगावकर यांच्या परसबागेत केवळ ही अळंबीच नाही, तर निसर्गाचा मोठा खजिना दडला आहे. त्यांनी आपल्या बागेत आढळणाऱ्या विविध प्रजातींच्या पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरे, दुर्मिळ साप आणि बेडकांच्या जातींची सविस्तर नोंद ठेवली आहे. त्यांच्या या निसर्गपूरक उपक्रमामुळे आणि दुर्मिळ अळंबीच्या अभ्यासामुळे या परसबागेला पर्यावरण क्षेत्रातील अनेक मान्यवर, संशोधक आणि निसर्गप्रेमी सातत्याने भेटी देत आहेत.
होडावडे गावात झालेल्या या दुर्मिळ अळंबीच्या पुनरागमनामुळे पर्यावरण अभ्यासक आणि निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, स्थानिक पातळीवर या अळंबीच्या सखोल अभ्यासाची मोठी संधी निर्माण झाली आहे.












