खेड (प्रतिनिधी) : खेड-दापोली मार्गावरील नारंगी नदीला आलेल्या पुरामुळे हा मार्ग रविवारी सायंकाळी सुमारे ६ वाजल्यापासून वाहतुकीसाठी ठप्प झाला होता. मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी सोमवारी सकाळपर्यंतही या मार्गावर पुराचे पाणी कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहनांची संथ गतीने ये-जा सुरू आहे.
दरम्यान, नारंगी नदीच्या पाण्याची पातळी हळूहळू कमी होत असल्याने रस्त्यावरील पाणीही ओसरू लागले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होत असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. वाहनचालकांनी खबरदारी घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













