देवगड, ता. ६ : तालुक्यात सोमवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी घरांचे व शेतीचे नुकसान झाले. आज दिवसभरात ७५ मिमी पावसाची नोंद झाली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मौजे गव्हाणे येथे श्री प्रकाश गणपत देवरुखकर यांच्या राहत्या घरावर आंब्याची मोठी फांदी कोसळल्याने छतावरील सिमेंटचे पत्रे फुटून नुकसान झाले.
वळीवंडे गावातील श्री श्रीकांत बुधाजी सावंत यांच्या घरावरील पत्रे जोरदार वाऱ्यामुळे उडून गेल्याने अंदाजे ६ हजार रुपयांचे नुकसान झाले.
तसेच मौजे किंजवडे येथे श्री विलास पडावे यांच्या शेतातील पाच ते सहा सुपारीची (फोपळी) झाडे कोसळून अंदाजे ८ हजार रुपयांचे नुकसान झाले.
या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, संबंधित प्रकरणांचे पंचनामे लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे.













