संदिप गावडे आणि गौरव मुळीक यांच्या हस्ते पत्रे व कौलांचे वितरण
सावंतवाडी:
चौकुळ-बेरडकी परिसरात झालेल्या भीषण चक्रीवादळामुळे अनेक नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. घरांवरील छप्परे आणि पत्रे उडून गेल्याने अनेक कुटुंबे संकटात सापडली होती. या नैसर्गिक आपत्तीची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टीच्या वतीने तत्परतेने मदत कार्याचा हात पुढे करण्यात आला असून, नुकसानग्रस्तांना छपरासाठी पत्रे आणि कौलांचे वाटप करण्यात आले आहे.
वादळाची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे आणि सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आपत्तीग्रस्त कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला.
या संकटाच्या काळात नुकसानग्रस्त कुटुंबांना आपली घरे पुन्हा उभी करता यावीत, यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार पत्रे आणि कौलांची मदत देण्यात आली. भाजपच्या या तात्काळ आणि संवेदनशील मदतीमुळे संकटग्रस्त ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, गावकऱ्यांकडून पक्षाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले जात आहे.
या मदत वाटप प्रसंगी चौकुळचे सरपंच गुलाबराव गावडे, भाजप बूथ अध्यक्ष संतोष गावडे, गेळे गावचे सरपंच सागर ढोकरे, अच्युत गावडे, दयानंद गावडे यांच्यासह चौकुळ गावातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













