दोडामार्ग:प्रतिनिधी
शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे वझरे (ता. दोडामार्ग) गावात मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून, सुमारे २८ घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी स्वतः वझरे गावाला भेट देऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि ग्रामस्थांना धीर दिला.
प्रशासनाकडून तातडीने पावले
जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यादरम्यान नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वादळामुळे झालेल्या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक तलाठ्यांनी गावात धाव घेत नुकसानीचे प्राथमिक पंचनामे पूर्ण केले आहेत.
ग्रामस्थांशी संवाद
या पाहणी दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे आणि नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी बाधीत ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे व समस्या ऐकून घेतल्या. पावसामुळे अनेक कुटुंबांची घरे कोसळल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून योग्य ती मदत लवकरात लवकर मिळवून दिली जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
या पाहणीच्या वेळी गावातील पोलीस पाटील, सरपंच आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकसानग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.














