वळिवडेच्या माणुसकीच्या इतिहासाला नवी उजळणी; पोलंडच्या इतिहासतज्ज्ञांची कोल्हापूरला भेट

डॉ. माल्गोर्झाता बोनिकोव्स्का यांच्याशी संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती यांची न्यू पॅलेस येथे भेट;भारत-पोलंडच्या ऐतिहासिक संबंधांवर चर्चा

पन्हाळा प्रतिनिधि प्रतापसिंह काळे

इतिहासाच्या पानांवर काही घटना काळाच्या ओघात धूसर होतात; मात्र माणुसकीने लिहिलेली पाने पिढ्यान्‌पिढ्या जिवंत राहतात. वळीवडेच्या मातीत १९४२ ते १९४८ या काळात सुमारे पाच हजार पोलिश निर्वासितांना मिळालेला आश्रय हा भारत-पोलंडच्या संबंधांमधील असाच माणुसकीचा उजळ अध्याय आहे. याच ऐतिहासिक ऋणबंधाला नव्याने उजाळा देत पोलंडच्या प्रख्यात इतिहासतज्ज्ञ आणि Centre for International Relations (CSM), वॉर्सा यांच्या संचालिका डॉ. माल्गोर्झाता बोनिकोव्स्का यांनी कोल्हापूरला भेट दिली.

या भेटीदरम्यान माजी राज्यसभा सदस्य संभाजीराजे छत्रपती आणि संयोगिताराजे छत्रपती यांनी न्यू पॅलेस येथे डॉ. बोनिकोव्स्का यांची भेट घेतली. यावेळी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे आणि पोलंडचे ऐतिहासिक संबंध, वळीवडेतील पोलिश निर्वासितांचा इतिहास तसेच या वारशाचे जतन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.दुसऱ्या महायुद्धाच्या काळात संकटात सापडलेल्या हजारो पोलिश नागरिकांना तत्कालीन कोल्हापूर संस्थानने आश्रय दिला. परक्या भूमीवर मिळालेला हा आधार पोलिश जनतेच्या स्मृतीत आजही कृतज्ञतेने जपला जातो. वळीवडे येथे प्रस्तावित ‘Museum of Humanity and Peace’च्या माध्यमातून या इतिहासाला केवळ संग्रहालयाच्या भिंतींत बंदिस्त न करता मानवता, शांतता आणि जागतिक मैत्रीचा संदेश देणारे केंद्र बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

डॉ. बोनिकोव्स्का यांनी या ऐतिहासिक वारशाचा प्रत्यक्ष मागोवा घेत कोल्हापुरातील पोलिश स्मशानभूमी आणि पोलिश स्मारक स्तंभाला भेट देऊन दिवंगत पोलिश निर्वासितांना पुष्पांजली अर्पण केली. वळीवडेच्या मातीशी जोडलेल्या आठवणी, तेथील निर्वासितांचे जीवन आणि त्यांच्या पुढील पिढ्यांच्या स्मृती याबाबत त्यांनी विशेष आस्था व्यक्त केली.
कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा परिचय करून घेताना त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई तसेच श्री तुळजाभवानीचे दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल आदर व्यक्त करत त्यांनी जुना राजवाडा येथे महाराजांच्या तख्तासमोर पारंपरिक मुजरा करून अभिवादन केले.या दौऱ्यात शिवाजी विद्यापीठालाही भेट देत कुलगुरू डॉ. आर. के. कामत, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी डॉ. बोनिकोव्स्का यांनी संवाद साधला. पोलंडमधील विद्यापीठांशी विद्यार्थी-प्राध्यापक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन आणि शैक्षणिक सहकार्याच्या शक्यतांवर चर्चा झाली.

वळीवडेने कधीकाळी पोलंडच्या निर्वासितांसाठी घराचे दार उघडले होते. आता त्याच वळीवडेच्या स्मृतीतून दोन देशांच्या भविष्यातील मैत्रीचा दरवाजा उघडण्याची वेळ आली आहे. इतिहासातील माणुसकीचा हा ठेवा संग्रहालयाच्या रूपाने पुढील पिढ्यांसमोर उभा राहिला, तर कोल्हापूर-पोलंड संबंधांचा हा अध्याय केवळ स्मरणात न राहता जगासाठी शांतता आणि मानवतेचा संदेश ठरेल.