मान्सूनपूर्व कामांकडे दुर्लक्ष; शृंगारतळी महावितरण कार्यालयाला नागरिकांचा घेराव

गुहागर प्रतिनिधी:
मान्सूनपूर्व आवश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेत न केल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, वीजवाहिन्या तुटणे, वीजखांब कोसळणे तसेच नागरिकांच्या संमतीशिवाय सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याच्या आरोपांमुळे संतप्त नागरिकांनी शृंगारतळी येथील महावितरण कार्यालयाला घेराव घालत उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मान्सून सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटणे, वीजखांब कोसळणे आणि दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित राहण्याच्या घटना घडत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. मान्सूनपूर्व झाडांच्या फांद्यांची छाटणी, वीजवाहिन्यांची तपासणी, जीर्ण खांब बदलणे आणि आवश्यक देखभाल करण्यात महावितरण प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला.
याशिवाय, स्मार्ट मीटर बसविण्याबाबत नागरिकांची पुरेशी माहिती न देता तसेच संमती न घेता सक्ती केली जात असल्याचा मुद्दाही आंदोलनादरम्यान उपस्थित करण्यात आला. स्मार्ट मीटरबाबत शासनाची भूमिका स्पष्ट करावी, नागरिकांच्या शंका दूर कराव्यात आणि सक्तीची पद्धत तात्काळ थांबवावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना विविध समस्यांचा पाढा वाचून दाखवत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्यांमुळे शेती, व्यावसायिक व्यवहार आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत लवकरात लवकर आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे तसेच वरिष्ठ स्तरावर नागरिकांच्या मागण्या पोहोचविण्याचे आश्वासन दिले. मात्र, ठोस कार्यवाही न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी यावेळी दिला.