इयत्ता पाचवी व आठवीच्या गुणवत्ता यादीत पाच विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
कुडाळ : फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत न्यू शिवाजी हायस्कूल व प्री-प्रायमरी इंग्लिश मीडियम, जांभवडेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. सर्वसाधारण ग्रामीण गटातून एकूण पाच विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
इयत्ता पाचवी (इंग्रजी माध्यम) मधून कु. पूर्वी व्यंकट खरात हिने गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. तर इयत्ता आठवीमध्ये मराठी माध्यमातून कु. सलोनी सिताराम चव्हाण व कु. अर्जुन किशोर तांबे यांनी, तसेच इंग्रजी माध्यमातून कु. हार्दिक यशपाल सावंत व कु. सौम्या अमोगसिद्ध पुजारी यांनी घवघवीत यश मिळवत शाळेची गौरवशाली परंपरा कायम राखली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल माध्यमिक शिक्षण समिती जांभवडे पंचक्रोशीचे चेअरमन सन्माननीय श्री. सुभाषजी मडव, व्हाईस चेअरमन बा. शी. परब गुरुजी, सेक्रेटरी श्री. एकनाथ चव्हाण गुरुजी, सहसेक्रेटरी श्री. रामदास मडव, संस्था सदस्य श्री. मनोहर गावकर, श्री. लहू घाडी, श्री. संजय चव्हाण तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
याशिवाय प्रशालेचे प्राचार्य श्री. अनिल कासले, पर्यवेक्षक श्री. सावंत, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. पुजारी मॅडम, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे जांभवडे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या मेहनतीला व शिक्षकांच्या मार्गदर्शनाला यशाची पावती मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.












