​दापोली जवळील आंजर्ले बायपास रोडवर भीषण अपघात; आयशर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

​दापोली:
हर्णे ते आंजर्ले जाणाऱ्या बायपास रोडवरील हॉटेल रेंझीटाजवळ ६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात बासीद अल्ली दरबार बरमारे (वय ३२ वर्षे, रा. आडे वरचा मोहल्ला, ता. दापोली) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अवनी अनंत चौधरी (वय ३५ वर्षे, रा. जुईकर मोहल्ला, अडखळ कदमवाडी, ता. दापोली) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून, संशयित आरोपी आयशर टेम्पो चालक गंगाराम रामु माने (वय ५५ वर्षे, रा. नवानगर, ता. दापोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै रोजी सायंकाळी ७:०० वाजता फिर्यादी यांच्या ओळखीचे बासीद अल्ली दरबार बरमारे हे आपल्या सुझुकी ॲक्सेस दुचाकीने (क्र. MH 08 AV 4714) हर्णे कडून आंजर्लेकडे जात होते. याचवेळी आंजर्लेकडून येणाऱ्या एका आयशर टेम्पोच्या (क्र. MH 08 W 9013) चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने, हयगयीने आणि अविचाराने चालवून समोरून येणाऱ्या ॲक्सेस दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार बासीद बरमारे यांच्या डोक्यावरून आयशर टेम्पोचे चाक गेले. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते या अपघातात मरण पावले. या अपघातात दोन्ही वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
​या घटनेनंतर ७ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री ००:१३ वाजता दापोली पोलीस ठाण्यात संशयित आरोपी चालकाविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.