मांढरदेव गावच्या माहेरवाशीनिचा शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी जीवन प्रवास

चिपळूण (प्रतिनिधी) : मांढरदेव गावचे सुपुत्र संपतराव काळूराम मांढरे निवृत्त स्टेट बँक अधिकारी यांची कन्या सौ.भाग्यश्री अरविंद दुधाडे- मांढरे यांचे शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट नेतृत्व, संशोधनातील सातत्यपूर्ण योगदान, सामाजिक बांधिलकी आणि बहुआयामी शैक्षणिक प्रगती यांचा सुंदर संगम म्हणजे प्राचार्य, अॅड. डॉ. भाग्यश्री मांढरे दुधाडे.
गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. दुधाडे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्य व राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ. दुधाडे यांनी नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एलएलबी पदवी प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्यासह संपादन केली आहे. यापूर्वी त्यांनी एम एससी (केमिस्ट्री), एम एससी (विषयावर संवाद) एमबीए (एच आर), एमए (सायकॉलॉजी) एमए (इंग्लिश) बी एससी, पीजीडी, बीए, बी एस एम (शिक्षक प्रशिक्षण कोर्स) यासह अनेक पदव्या प्रथम श्रेणीत मिळवल्या असून त्या युजीसी नेट पात्र आहेत. धडपड, बहु विषयक अध्ययन हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष वैशिष्ट्य आहे. सन २००९ पासून स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन पुणे येथे कार्यरत असलेल्या डॉ.दुधाडे सध्या प्राचार्य व सहयोगी शिक्षक प्राध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थी विकासासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. कला वाणिज्य व विज्ञान, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. संशोधन क्षेत्रात त्यांनी ५१ संशोधन निबंध प्रकाशित केले असून ४३ संशोधनपत्रांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये सादरीकरण केले आहे. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएचडी संशोधन मार्गदर्शन असून अनेक संशोधकांना मार्गदर्शन करीत आहेत. विविध विद्यापीठे, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विषयतज्ञ, संसाधन व्यक्ती, अध्यक्ष आणि परीक्षक म्हणून त्यांचे योगदान उल्लेखनीय झाले आहे. लेखन क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे.