लवकरच प्रत्यक्ष कामाला होणार सुरुवात!
चिपळूण( वार्ताहर) : वीर–देवपाट परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चिपळूण कार्यालयाकडून संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
या कामासाठी जि.प. सदस्या तथा स्थायी समिती सदस्या सौ. शिवानी सावंत यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. वीर, रानपाट, लोहारवाडी, देवपाट या गावांसाठी हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळूनही प्रशासकीय स्तरावर विलंब होत असल्याचे लक्षात येताच सौ. शिवानी सावंत यांनी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय प्रामुख्याने मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडेही सातत्याने पाठपुरावा केला असता पालकमंत्र्यांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेत संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश निर्गमित करण्याचे निर्देश दिले, त्यानंतर आता कार्यारंभ आदेश जारी झाल्याने रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी १७ फेब्रुवारी २०२६ मध्ये १,७५,१४,४८८ रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन २६ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चिपळूण कार्यालयाकडून कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आला आहे. या कामाची स्वीकृत किंमत १ कोटी २० लाख ८७ हजार ७४८ रुपये ६८ पैसे असून, करारानुसार पावसाळ्यासह १२ महिन्यांत काम पूर्ण करण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे. कार्यारंभ आदेश मिळाल्याने आता या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र, केवळ काम सुरू होणे महत्त्वाचे नसून ते दर्जेदार आणि निर्धारित मुदतीत पूर्ण होणेही तितकेच आवश्यक असल्याने कामाच्या गुणवत्तेवर आपण बारकाईने लक्ष ठेवणार असल्याचे सौ. शिवानी सावंत यांनी स्पष्ट केले आहे. अनेक गावांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्याच्या कामाला अखेर प्रशासकीय गती मिळाल्याने परिसरातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.












