रहिवासी आक्रमक ; ४८ तासांत तोडगा न निघाल्यास उपोषणाचा इशारा
सावंतवाडी :
नवे हक्काचे घर घेऊन अवघ्या दीड-दोन वर्षांतच इमारतीमधील गंभीर त्रुटींमुळे रहिवाशांना नरकयातना सहन कराव्या लागत असल्याचा धक्कादायक प्रकार सावंतवाडीत समोर आला आहे. न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद येथील ‘टीचर कॉलनी सोसायटी’च्या बिल्डरने रहिवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी संतप्त नागरिकांनी थेट सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्याकडे धाव घेत तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. पुढील ४८ तासांत यावर योग्य तो तोडगा न निघाल्यास नगरपरिषद आवारात बेमुदत उपोषणाला बसण्याचा आक्रमक इशारा रहिवाशांनी दिला आहे.
रहिवाशांच्या आरोपानुसार, ‘एमएस पटेल कन्स्ट्रकशन’चे मोसिम पटेल आणि राफीक पटेल यांनी फ्लॅट विक्रीच्या वेळी अनेक मोठी आश्वासने दिली होती. मात्र, आज वर्षभरानंतरही पाण्याची कोंडी करून फसवणूक केली आहे. पार्किंगच्या जागेवर बिल्डरने बेकायदेशीरपणे रो-हाउसचे बांधकाम सुरू केले असून, दोन वर्षांचा आगाऊ देखभाल खर्च घेऊनही इमारतीची कोणतीही देखभाल केलेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही ‘सेल डीड’ करून देण्यास बिल्डर टाळाटाळ करत आहे. इमारतीत पिण्याच्या पाण्याची सुरक्षित सोय नसल्याने रहिवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसून बाहेरून पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यातच ड्रेनेज लाईन तुंबल्याने इमारतीभोवती सांडपाणी व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
बांधकामासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे अवघ्या एका वर्षात इमारतीला आणि फ्लॅटमध्ये मोठ्या भेगा गेल्या आहेत. लिफ्ट बंद असल्यामुळे वृद्धांना पायऱ्यांवरून ये-जा करावी लागत आहे. प्राथमिक सुविधा आणि कायदेशीर बाबींची पूर्तता नसतानाही सावंतवाडी नगरपालिकेने या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र (OC) कसे मंजूर केले? असा संतप्त सवाल रहिवाशांनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करताना उपस्थित केला.
यावेळी १५ दिवस पाणी नसल्याने व बिल्डरच्या छळामुळे उपस्थित महिलांना अश्रू अनावर झाले. महिलांनी सांगितले की, बिल्डरने त्यांच्याविरोधात खोट्या केसीस दाखल केल्या असून पालकमंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणात तात्काळ न्याय द्यावा. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी महिलांना आधार देत, अधिकाऱ्यांसह घटनास्थळी येऊन पाहणी करण्याचे आणि प्रशासकीय काळात झालेल्या कामाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी स्थानिक नगरसेविका सुनिता पेडणेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, सभापती सुधीर आडीवरेकर, प्रतिक बांदेकर, दिपाली भालेकर, सुकन्या टोपले यांच्यासह टीचर कॉलनी सोसायटीचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













