अभिमान वाटावा असे आमदार निलेश राणे यांचे जनहिताचे कार्य!

दशावतार, शेतकरी, कष्टकरी मच्छिमार आणि सर्वसामांन्याना न्याय

गतिमान विकासातही मालवण कुडाळ मतदारसंघ अग्रेसर

प्रत्येक अधिवेशनात घुमतो जनतेचा आवाज

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मांडली भूमिका

मालवण | प्रतिनिधी : अधिवेशनात कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, मच्छीमार आणि दशावतार कलाकारांचे जिव्हाळ्याचे प्रश्न अत्यंत अभ्यासूपूर्वक आणि ठामपणे मांडून सभागृहाचे लक्ष वेधले. आमदार निलेश राणे यांनी सर्वसामान्यांच्या भावनांना सभागृहात वाचा फोडली, महायुती सरकारनेही या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतले. मतदार संघाच्या गतिमान विकासासोबत सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे हक्काचे नेतृत्व म्हणजे आमचे आमदार निलेश राणे अश्या भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत. प्रत्येकाला अभिमान वाटावा असे आमदार निलेश राणे यांचे कार्य आहे. अशी भूमिका शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनीपत्रकार परिषदेत दिली.

मालवण येथील आमदार निलेश राणे महायुती जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, महाराष्ट्र राज्य लोककला अनुदान शिफारस समिती सदस्य देवेंद्र नाईक, नगरसेविका शर्वरी पाटकर, राजा सामंत, भाऊ मोरजे, राजू बिडये, संतोष पालव, भाई मांजरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या विविध प्रमुख मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली आणि महायुती सरकारचेही आभार मानले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा आणि काजू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आमदार निलेश राणे यांनी हा प्रश्न सभागृहात लावून धरल्यानंतर, कृषिमंत्र्यांनी अवघ्या १२ तासांत निर्णय घेत शेतकऱ्यांना मोठी मदत जाहीर केली. याशिवाय इन्शुरन्सचे पैसे वेगळे मिळणार असून, पुरवणी यादीमध्ये शेतकऱ्यांसाठी आणखी एक विशेष पॅकेज जाहीर करण्याचे कृषिमंत्र्यांनी मान्य केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट मदत मिळवून देण्यात आमदारांना यश आले आहे.

पारंपरिक व व्यावसायिक मच्छीमारांच्या डिझेल कोट्याचा प्रश्न आमदारांनी सभागृहात मांडला. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात असणारा कमी डिझेल कोटा, डिझेलचे वाढीव दर आणि परतावा यातील तफावत त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. यावर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे हे दोन्ही बंधू मच्छीमारांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असून, मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनीही यावर सकारात्मक पावले उचलली आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रात जुने वीज मीटर काढून ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याचा जो उपक्रम राबवला जात होता, तो सर्वसामान्यांसाठी कसा जाचक आहे, हे आमदार राणे यांनी सभागृहात स्पष्ट केले. जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहोचवल्या.

जिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्त पदे, डॉक्टरांची कमतरता आणि औषध तुटवडा याकडे त्यांनी आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. नव्याने सुरू होणारे मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालय या दोन्ही व्यवस्थांचा ताळमेळ बसवून सर्वसामान्यांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारतींची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली.
मतदारसंघातील वाहतूक कोंडी आणि प्रवाशांची सोय लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांनी नवीन एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच प्रवासी शेडच्या कामांसाठी शासनाकडून निधी मंजूर करून घेतला आहे.

सिंधुदुर्गाची अस्मिता असलेल्या दशावतार, भजन आणि कीर्तन कलाकारांना न्याय देण्यासाठी आमदार निलेश राणे हे राज्य शासन स्तरावर, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. आता पुन्हा एकदा विधिमंडळात हा विषय लावून धरल्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी कलाकारांसाठी दुप्पट स्वरूपात वार्षिक साडेचार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. तसेच कलाकारांना ओळखपत्र, अन्य सुविधा, जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्थानिक पातळीवर शिबिरे घेऊन नोंदणी प्रक्रिया सोपी करण्याचे मान्य केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ८६ पारंपरिक दशावतार कंपन्या असून अडीच ते तीन हजार कलाकार आहेत. तसेच भजनी कलाकारांची संख्या १५ ते २० हजारांच्या घरात आहे. शासनाचा सध्याचा प्रतिवर्षी १०० लोकांचा मानधनाचा कोटा अत्यंत तोकडा आहे. हा कोटा किमान तीन पटीने वाढवावा, यासाठी प्रयत्न पाठपुरावा सुरु आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हाही प्रश्न सोडवला जाईल. तसेच जास्त प्रयोग करणाऱ्या मंडळ व कलावंत यांनाही अधिक फायदा मिळवून देणे, ज्येष्ठ कलाकारांना विशेष दर्जा देऊन मानधनात प्राधान्य मिळावे, अशी आमची मागणी आहे असे श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी जे आमदार, खासदार राहिले त्यांना दहा वर्षात काहीच करता आले नाही. मात्र टीका करणे हाच त्यांचा कार्यक्रम राहिला. स्वतः आमदार असताना त्यांनी हाऊसमध्ये जनतेच्या प्रश्नांवर किती वेळ भाषण केले, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. आमदार-खासदार हे गावात येऊन टीका करण्यासाठी नसून विधिमंडळात आणि संसदेत जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी असतात, याचे भान त्यांनी ठेवावे, असा टोला सामंत यांनी विरोधकांना लगावला.

सामंत म्हणाले की, आम्ही जरी शिवसेनेचे काम करत असलो, तरी जेव्हा सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि मच्छीमार निलेश राणे यांच्या कामाचे कौतुक करतात, तेव्हा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आम्ही योग्य लोकप्रतिनिधी निवडल्याची भावना मतदारांमध्ये आहे. सिंधुदुर्गाच्या गतिमान आणि सर्वांगीण विकासासाठी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे, आमदार दिपक केसरकर सर्वजण भगीरथ प्रयत्न करत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार यांचाही विशेष उल्लेख दत्ता सामंत यांनी केला. आमदार निलेश राणे जनसेवा करतं असूम त्यांना पुढील वाटचालीस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना करतो असेही श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य लोककला अनुदान शिफारस समिती सदस्य देवेंद्र नाईक म्हणाले, कोकणची कित्येक वर्षांची समृद्ध दशावतार परंपरा टिकवून ठेवण्याचे काम कलाकारांनी केले आहे. दशावतारी नाटकात जरी राजाची भूमिका करत असलो, तरी खऱ्या आयुष्यात या कलेला कित्येक वर्षे योग्य तो राजाश्रय मिळत नव्हता. मात्र, आमदार निलेश राणे यांनी हा राजाश्रय मिळवून देण्याचे ऐतिहासिक काम केले आहे.
निलेश राणे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्यासमोर दशावतार कला आणि कलाकारांचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडले. या प्रश्नांना वाचा फोडल्यानंतर मंत्री आशीष शेलार यांनीही त्याला सकारात्मक दुजोरा दिला. याबद्दल सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, आमदार निलेश राणे आणि दत्ता सामंत यांचे कलाकारांनी विशेष आभार मानले. श्री. नाईक यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्याचा गौरव केला. कलाकारांवर जेव्हा जेव्हा संकट आले, विशेषतः कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात, तेव्हा दत्ता सामंत यांनी प्रत्येक कलाकाराला आणि त्यांच्या कुटुंबाला अन्नधान्यापासून ते आर्थिक मदतीपर्यंत सर्वतोपरी पुरवठा केला. संकटसमयी पाठीशी राहणारे ते आमचे खरे पाठीराखे आहेत, अशा शब्दांत कलाकारांनी भावना व्यक्त केल्या.