देवरूख (प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यात एसटी प्रशासनाच्या मनमानी आणि बेजबाबदार कारभारामुळे प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमेश्वरहून कडवईमार्गे करजुवे जाणारी एसटी बस गेल्या ४ ते ५ दिवसांपासून तिच्या ठरलेल्या मार्गावरून म्हणजे किंजळकरवाडी मार्गे न जाता थेट जात असल्याने या मार्गावरील विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. गुरूवारी संतप्त विद्यार्थी, ग्रामस्थ आणि प्रवाशांनी कडवई रेल्वे ब्रिज येथे एसटी बस रोखून धरली. अखेर या प्रकरणात जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी घटनास्थळी उपस्थित नसतानाही, माहिती मिळताच थेट एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून कडक शब्दांत जाब विचारला. त्यांच्या या मध्यस्थीनंतर ही बस पूर्ववत मार्गावर सोडण्यात आली.
संगमेश्वरहून कडवई मार्गे करजुवे जाणारी एसटी बस किंजळकरवाडी तसेच ओकटेवाडीमार्गे जाते. या भागातील शालेय विद्यार्थी व कॉलेज युवक कडवई येथील शाळेत जाण्यासाठी पूर्णपणे याच एसटी बसवर अवलंबून आहेत. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून ही बस किंजळकरवाडी आणि ओकटेवाडी या ठरलेल्या मार्गांवर न जाता थेट कडवई येथे जात होती. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे तर हाल होतच होते, पण शालेय विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत होते. विद्यार्थ्यांना मोठी पायपीट करावी लागत होती, तर काहींना पदरचे पैसे खर्च करून खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी देखील ही बस तुरळ फाट्यावर आली असता, तेथे उपस्थित असलेले शालेय विद्यार्थी, प्रवाशी आणि ग्रामस्थांनी गाडी थांबवली.
त्यांनी चालक आणि वाहकाला ही बस नेहमीप्रमाणे किंजळकरवाडी व ओकटेवाडी मार्गे नेण्याची नम्र विनंती केली. मात्र, चालक-वाहकांनी याला साफ नकार दिला. चालक- वाहकांच्या या भूमिकेमुळे उपस्थित ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी आक्रमक पाऊल उचलत एसटी बस पुढे जाऊ दिली नाही. या प्रकाराची, विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाची आणि हालाची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी तात्काळ या विषयाची गंभीर दखल घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून थेट एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोबाईलवरून कॉल केला. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि सामान्य प्रवाशांची अडवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, बस तात्काळ ठरलेल्या मार्गानेच गेली पाहिजे,” अशा कडक आणि रोकठोक शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
संतोष थेराडे यांच्या या आक्रमक फोननंतर एसटी प्रशासनाने तात्काळ नमते घेतले. अधिकाऱ्यांनी तातडीने चालक-वाहकांना सूचना दिल्यानंतर अखेर ती बस किंजळकरवाडी आणि ओकटेवाडी मार्गावर रवाना करण्यात आली. प्रशासनाला जाब विचारण्याच्या आणि हक्क पदरात पाडून घेण्याच्या या यशस्वी प्रयत्नावेळी घटनास्थळावर सामाजिक कार्यकर्ते विजय कुवळेकर यांच्यासह संजय उजगावकर, रवींद्र कुवळेकर, संजय कुवळेकर, नवनाथ उजगावकर आणि स्थानिक गावकर, मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शाळा-कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. एसटी प्रशासनाच्या या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले असून, भविष्यात जर पुन्हा अशा प्रकारे बसचा मार्ग बदलण्यात आला, तर अधिक तीव्र पवित्रा घेतला जाईल, असा इशारा विजय कुवळेकर यांनी दिला आहे.













