खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील बिजघर येथील स्वामी भगवान बुवा जंगम यांच्या घराच्या परसबागेत रानटी जावडी मांजर आढळून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच निवृत्त पोलीस अधिकारी तसेच पंचक्रोशीतील ज्येष्ठ सामाजिक नेते कृष्णाजीराव महादेवराव भोसले यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खबरदारीपूर्वक रानटी जावडी मांजराला कोणतीही इजा न होऊ देता सुरक्षितरीत्या पकडले. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्या वन्यप्राण्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या सोडण्यात आले.
वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. या प्रसंगी ग्रामस्थांनीही सहकार्याची भूमिका घेतली. परिसरात वन्यप्राणी आढळल्यास त्यांना पकडण्याचा किंवा हाकलून लावण्याचा प्रयत्न न करता त्वरित वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
या घटनेमुळे पावसाळ्याच्या काळात अन्न व निवाऱ्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, नागरिकांनी अशा वेळी सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे.













