मसुरे | झुंजार पेडणेकर
पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना आपल्या मातीची, संस्कृतीची आणि कष्टाची जाणीव व्हावी, या उद्देशाने मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाफेखोल तोरसोळे येथे नुकताच ‘बांधावरची शाळा’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. पावसाळ्याच्या दिवसांत शेतीच्या कामांची लगबग सुरू असताना, शाळेतील एक दिवस थेट निसर्गाच्या सानिध्यात ‘बळीराजासाठी’ समर्पित करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी वर्गाबाहेर पडून थेट शेताच्या चिखलात उतरत भात शेतीचे प्रत्यक्ष धडे गिरवले.
या ‘बांधावरच्या शाळेत’ विद्यार्थ्यांना केवळ माहिती न देता, त्यांच्याकडून शेतीतील अत्यंत महत्त्वाच्या कामांचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.
तरवा काढणे व उकळ करणे, गुटा वापरणे, टॅक्टर चालवणे आदी बाबत माहिती घेतली. सरतेशेवटी सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने चिखलात उतरून पारंपरिक पद्धतीने भात लावणी करण्याचा आनंद लुटला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. दिपिका दिपक पताने, ग्रामपंचायत सदस्या सौ. वैशाली गावडे, तसेच श्रीम. स्मिता शिंदे, श्रीम. सिमा जाधव आणि श्रीम. आनंदी खांदारे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले व या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. मनिषा ठाकर आणि शिक्षक श्री. सुयोग धामापूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. पुस्तकातील धड्यांना प्रत्यक्ष कृतीची जोड दिल्यामुळे मुलांचा बौद्धिक आणि व्यावहारिक विकास होण्यास मदत होईल, असा विश्वास शिक्षकांनी यावेळी व्यक्त केला. या अनोख्या उपक्रमात गावातील बळीराजा आणि ग्रामस्थांनीही शाळेला मोलाचे सहकार्य केले.
दिवसभर चिखलात खेळत, हसत-खेळत शेतीचे धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद या उपक्रमाचे यश अधोरेखित करत होता.














