विल्सन किप्रॉप यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गात ‘रनिंग कॅम्प’ व ‘ट्रेनिंग सेंटर’ सुरू करणार: अजित राणे
सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्याची समृद्ध संस्कृती, आदरातिथ्य आणि मालवणी बोलीभाषेतील गोडवा खरोखरच मनाला भावणारा आहे. या जिल्ह्यावर कोणीही प्रेम करावे असा हा प्रदेश आहे, अशा शब्दांत केनियाचे जागतिक कीर्तीचे धावपटू विल्सन किप्रॉप यांनी आपले उद्गार काढले. कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) सिंधुदुर्ग मंडळाच्या वतीने आयोजित दौऱ्यादरम्यान सावंतवाडी येथे त्यांचा व केनियास्थित सिंधुदुर्गचे सुपुत्र अजित राणे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना अजित राणे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. केनियामध्ये धावणे (रनिंग) ही तिथली संस्कृती बनली आहे. अशीच रनिंग संस्कृती सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुजवण्यासाठी व येथील तरुणांना जागतिक पातळीवर चमकण्याची संधी देण्यासाठी जिल्ह्यात लवकरच एक आधुनिक ‘रनिंग कॅम्प व ट्रेनिंग सेंटर’ उभारण्यात येणार आहे. या सेंटरमध्ये ‘द्रोणाचार्य’ पुरस्कार विजेत्यांसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शक व प्रशिक्षक आणले जातील. जागतिक कीर्तीचे धावपटू विल्सन किप्रॉप हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या रनिंग संस्कृतीचे ‘ब्रँड ॲंबेसिडर’ असतील, असे राणे यांनी स्पष्ट केले.
मे महिन्यात नैरोबी (केनिया) येथे ‘महाराष्ट्र मंडळ नैरोबी’ आणि ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन अत्यंत उत्साहात पार पडले होते. या संमेलनाचे यजमानपद भूषवणाऱ्या व केनियात मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करणाऱ्या अजित राणे यांच्या समवेत विल्सन किप्रॉप हे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर कोमसाप सिंधुदुर्ग मंडळाच्या वतीने विल्सन किप्रॉप यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि कोकणी संस्कृतीचा पारंपरिक ‘भगवा फेटा’ बांधून शाही सत्कार करण्यात आला. तसेच अजित राणे यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
आपल्या सत्काराला उत्तर देताना विल्सन किप्रॉप कमालीचे भारावून गेले होते. डोक्यावर भगवा शाही फेटा बांधल्याने नवा अनुभव मिळाल्याचे सांगत ते म्हणाले की, सिंधुदुर्गात क्रीडा क्षेत्रात (स्पोर्ट्स) करिअर करण्यासाठी प्रचंड वाव आहे. मात्र, येथील तरुण याकडे तितक्या गांभीर्याने वळत नाहीत. येथील तरुणांनी धावण्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उतरून देशाचे नाव उज्ज्वल केले पाहिजे.
अजित राणे यांनी आपल्या मनोगतात केनियामधील मराठी बांधवांच्या कार्याचा गौरव केला. केनियामध्ये आम्ही कोकणची संस्कृती आणि मराठी भाषा अत्यंत प्रगल्भतेने जपत आहोत. तिथे गणेशोत्सव इतक्या धुमधडाक्यात साजरा केला जातो की, आपण कोकणातच आहोत असा भास होतो. याशिवाय दिवाळी, दसरा, होळी यांसारखे सणही तिथे उत्साहाने साजरे केले जातात, असे सांगत त्यांनी आतापर्यंत अनेक कोकणी बांधवांनी केनियाला भेट देऊन तेथील पर्यटन व खाद्यसंस्कृतीचा आनंद घेतल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला, तर प्रा. सुभाष गोवेकर यांनी विल्सन किप्रॉप व अजित राणे यांच्याशी संवाद साधला. या सोहळ्याला कोमसापचे जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, सहसचिव सुरेश पवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप वालावलकर, वृंदा कांबळी, प्रा. दिपाली काजरेकर, गोविंद पवार, स्वाती सावंत, आणि कोमसापचे युवा पदाधिकारी ॲड. मंदार म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.













