३५० कोटींचा नवा आराखडा जाहीर; कसब्यात अधिक जमीन संपादित होणार
उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांची विधान परिषदेत मोठी घोषणा
देवरूख (प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य स्मारक प्रकल्पाला अखेर गती मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. या महत्त्वाकांक्षी स्मारकासाठी ३५० कोटी रुपयांचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला असून, आवश्यकतेनुसार अतिरिक्त जमीनही संपादित केली जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
भाजपा आमदार प्रमोद जठार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना डॉ. सामंत यांनी ही घोषणा केली. यामुळे गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या या ऐतिहासिक प्रकल्पाला नव्याने चालना मिळणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरमधील सरदेसाई वाड्यात मुघलांनी फितुरीने कैद केले होते. हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील या पवित्र स्थळाचे ‘राष्ट्रीय स्मारकात’ रूपांतर व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. शासनाचा प्रयत्न या स्मारकाला ऐतिहासिक वैभव आणि जागतिक दर्जाचे स्वरूप देण्याचा आहे. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भागासह आवश्यक अतिरिक्त जागेच्या संपादनाचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी या स्मारकासाठी ४१७ कोटी ७५ लाख रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला होता.
मुख्यमंत्री यांनी ५ मार्च २०२५ रोजी विधिमंडळात स्मारकाची घोषणा केली होती, तर तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी निधीची तरतूद जाहीर केली होती. स्मारकाची जागा कसबा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याने ग्रामविकास विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे भूसंपादनाचा प्रस्ताव पाठवण्यास विलंब झाला. यामुळे वर्षभर हा प्रकल्प लाल फितीत अडकून पडला होता. आता नव्या ३५० कोटींच्या सुधारित आराखड्यामुळे आणि अतिरिक्त जमीन संपादनाच्या निर्णयामुळे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे संपूर्ण शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे.













