​आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करणार

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

​सावंतवाडी:
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ प्रशासनाला सहकार्य करण्यास सज्ज आहे. याबाबतचे एक विशेष निवेदन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन त्यांना सादर केले. प्रतिष्ठानच्या या सामाजिक व सेवाभावी उपक्रमांची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले.

​यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रतिभा वराळे यांचीही भेट घेतली आणि त्यांना संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सावंतवाडी समाज मंदिर येथील दिव्यांग मुलांच्या शाळेसाठी धडपडणाऱ्या प्रतिष्ठानच्या सदस्या रूपा मुद्राळे यांनी यावेळी दिव्यांग मुलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत सहकार्य करण्याची विनंती केली. त्यावर उपजिल्हाधिकारी वराळे यांनी दिव्यांग मुलांसाठी आणि बांधवांसाठी प्रशासनाकडून नक्कीच पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.

​गेल्या ६ वर्षांपासून अविरत सेवा
​’सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ ही एक नोंदणीकृत संस्था असून ती सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत असते. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीमध्ये गेल्या ६ वर्षांपासून ही संस्था नागरिकांना २४ तास विनामूल्य सेवा देत आहे. वादळी पावसात रस्त्यावर किंवा घरावर पडलेली झाडे स्वखर्चाने तोडून मार्ग मोकळा करणे, तसेच पूरग्रस्त परिस्थितीत तातडीने मदतकार्य करून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे, अशा कामांमध्ये संस्थेचे कार्यकर्ते नेहमीच अग्रेसर असतात.

​यावर्षीही पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन संस्थेने प्रशासनाला सहकार्याचा हात पुढे केला आहे. निवेदन सादर करताना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे, हेलन निबरे, शरदिनी बागवे, लक्ष्मण कदम आणि रवी जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.