देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रात मोकाट जनावरांमुळे वारंवार होणारे रस्ते अपघात रोखण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. निनाद देशपांडे यांच्या संकल्पनेतून मोकाट जनावरांच्या गळ्यात रिफ्लेक्टिव्ह बेल्ट बांधण्याच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या उपक्रमात भाजपचे कार्यकर्ते राजा भुजबळ, योगेश चांदोस्कर, दया पाटील आणि वैभव करंगुटकर यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून मोकाट जनावरांच्या गळ्यात रिफ्लेक्टिव्ह बेल्ट बांधले.
रिफ्लेक्टिव्ह बेल्टमुळे रात्रीच्या वेळी वाहनांच्या प्रकाशात जनावरे लांबूनच स्पष्टपणे दिसणार असल्याने अपघात टाळण्यास मोठी मदत होणार आहे. अलीकडील काही दिवसांत मोकाट जनावरांमुळे घडलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला असून नागरिकांकडून त्याचे स्वागत करण्यात येत आहे.
यापुढील काळातही देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील अधिकाधिक मोकाट जनावरांच्या गळ्यात रिफ्लेक्टिव्ह बेल्ट बांधण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.













