शेततळ्यात बुडून मुंबईतील २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू : कोकिसरे येथील घटना

वैभववाडी | प्रतिनिधी : कोकिसरे येथील शेततळ्यात बुडून मुंबईतील २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सिद्धांत प्रकाश जाधव (वय २३, रा. तारारोड, शिवाजीनगर, सांताक्रूझ, मुंबई) असे मृत तरुणाचे नाव आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वैभववाडी पोलिसांनी रविवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पंचनामा केला. या प्रकरणी त्याचा मित्र प्रसाद वळंजू यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात जबाब नोंदविला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद वळंजू हे मूळ कोकिसरे येथील रहिवासी असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यांच्या सोबत मुंबईतील १४ मित्र १० जुलै रोजी कोकिसरे येथे फिरण्यासाठी आले होते. ११ जुलै रोजी दुपारी सर्वांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर सायंकाळी साडेतीनच्या सुमारास कोकिसरे येथील सार्वजनिक गणपती विसर्जन होणाऱ्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेले. काहीजण पाण्यात उतरले, तर काही मित्र बंधाऱ्यावरच बसले होते.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सिद्धांत जाधव दिसत नसल्याचे मित्रांच्या लक्षात आले. त्याचे कपडे, मोबाईल व चप्पल पाण्याच्या काठावर आढळून आल्याने मित्रांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. याबाबत गावचे पोलीस पाटील व सरपंच यांनाही माहिती देण्यात आली. रात्री वैभववाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम सुरू केली. मात्र, अंधारामुळे शोधकार्य स्थगित करण्यात आले.
रविवारी सकाळी पुन्हा पोलीस, ग्रामस्थ व मित्रांनी संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. सकाळी सुमारे ८.४५ वाजता बंधाऱ्यातील सुमारे १५ ते २० फूट खोल पाण्यात सिद्धांत जाधव याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
या घटनेची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.