ठाणे पोलिसांकडून ताब्यात, अंनिससह ग्रामस्थांची कायदेशीर कारवाईची मागणी
सावंतवाडी:दैवी शक्ती आणि काळ्या जादूचा खोटा आव आणून सर्वसामान्य लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कोलगाव येथील भोंदू बाबा फिरोज आदम शेख याच्या विरोधात अखेर कायद्याचा बडगा सरसावला आहे. माजी खासदार विनायक राऊत यांच्या मुलावर आणि पत्नीवर झालेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर या बाबाचे नाव पुन्हा समोर आले असून, ठाणे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे या भोंदू बाबाचे अनेक अघोरी प्रकार आणि लोकांची फसवणूक चव्हाट्यावर आली आहे.
कोलगाव फणसवाडी येथे गेल्या ८ ते १० वर्षांपूर्वी एक दर्गा अस्तित्वात आला होता. हा दर्गा आपल्या स्वप्नात येत असल्याचा दावा करत फिरोज आदम शेख याने गावात अफवा पसरवण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला तावीज आणि दोरे देऊन त्याने गावातील भोळ्या भाविकांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीच्या काळात ग्रामस्थांनी स्वतः वर्गणी काढून या दर्ग्याचे उरूसही साजरे केले होते. मात्र, गेल्या २ ते ३ वर्षांत या बाबाचे स्वरूप पूर्णपणे बदलले.
स्वतःला काळी जादू अवगत असल्याचे भासवून त्याने घरातच अघोरी प्रकार सुरू केले. लोकांवर जादूटोणा करणे, बाहुल्यांवर अघोरी क्रिया करून त्या स्थानिक स्मशानभूमीत दफन करणे, काजळ, कुंकू, बांगड्या आणि हाडांचा वापर करून अघोरी उतारे करणे असे प्रकार तो करत होता. हा भोंदू बाबा आठवड्यातून प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी दोन बकऱ्यांचा बळी देत असे, तसेच वेगवेगळ्या वारी अंगात आणल्याचा खोटा आव आणून लोकांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पूर्वी अवघे १० ते १२ हजार रुपये कमवणारा हा बाबा आता लोकांची फसवणूक करून प्रचंड श्रीमंत झाला आहे. या बाबाच्या दारात दररोज सकाळी ७ वाजल्यापासून ग्राहकांच्या रांगा लागतात, ज्यामध्ये गोवा राज्यातून येणाऱ्या आलिशान गाड्यांचा मोठा समावेश असतो. एका सामान्य ग्राहकाकडून उतारा करण्यासाठी कमीत कमी ४ ते ५ हजार रुपये, तर श्रीमंत ग्राहकांकडून २० ते २५ हजार रुपयांपर्यंत रक्कम उकळली जात होती. केवळ एक लिंबू फिरवून उतारा करण्यासाठी ४०० रुपये घेतले जात, तर अमावस्येच्या दिवशी येथे जत्रेसारखे वातावरण असायचे.
भोंदू बाबाचे घर वाडीला लागूनच असल्याने या अघोरी कृत्यांचा लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत होता. जेव्हा गावातील लोकांनी एकत्र येऊन या प्रकाराबाबत विचारणा केली, तेव्हा बाबाने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच, “माझ्या वाटेला गेलात तर काळ्या जादूने करणी करून संपवून टाकेन,” अशी थेट धमकी ग्रामस्थांना दिली. याशिवाय, सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा राज्यातील मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्यांशी आपले लागेबांधे असून त्यांचा आपल्या पाठीशी हात असल्याचे सांगून तो गावकऱ्यांना घाबरवत होता.
या जाचाला कंटाळून अखेर कोलगाव येथील सियास अहमद शेख, नाज शफी अहमद शेख, इरफान इब्राहीम शेख यांच्यासह महिला व पुरुषांसह तब्बल १२० पेक्षा जास्त ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या करून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) सिंधुदुर्ग शाखेकडे लेखी तक्रार केली होती. तसेच वर्षभरापूर्वी सावंतवाडी पोलिसांकडेही तक्रार अर्ज देऊन ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३’ अंतर्गत या भोंदू बाबावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती.
याबाबत सावंतवाडी पोलिसांना विचारले असता, उरूसच्या आधी परवानगी देऊ नये या अनुषंगाने असा अर्ज दाखल झाला होता, अशी माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी दोन्ही बाजूंची बैठक घेऊन त्यावर तोडगा काढला होता व उरूस प्रथेप्रमाणे साजरा करण्याचे ठरले होते. त्यावेळी पोलिसांनी संबंधिताच्या घरी जाऊन चौकशी केली होती, मात्र काही संशयास्पद मिळाले नव्हते. त्यानंतर त्याने मशिदीला पायऱ्यांकरिता जागा देण्याचे मान्य केल्याने दोघांना समज देऊन वाद निकाली निघाला होता, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, आता ठाणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे या भोंदू बाबाच्या काळ्या कारनाम्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून पुन्हा जोर धरू लागली आहे.













