संगमेश्वर: पाटगाव घाटीत कार-दुचाकीचा भीषण अपघात

तीन तरूण जखमी; दोघे गंभीर जखमी

देवरूख (प्रतिनिधी) : 

संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नजीकच्या पाटगाव घाटीत रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीवरील तीन तरुण जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, आंबवली येथील प्रणव भेरे हा तरुण त्याचा मित्र शुभम जोईल (रा. तुळसणी) आणि प्रतीक भेरे (रा. आंबवली) या दोघांना सोबत घेऊन मोटारसायकलने रत्नागिरीच्या दिशेने निघाला होता. त्यांची दुचाकी पाटगाव घाटीत आली असता, विरुद्ध दिशेने म्हणजेच रत्नागिरीकडून देवरूखच्या दिशेने येणाऱ्या कारचा चालक जितेश नावडेकर याचा गाडीवरील ताबा सुटला. भरधाव कारने विरुद्ध बाजूला जात तरुणांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलवरील तिघेही तरुण रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि देवरूख पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी वाहतूक कोंडी दूर करत स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिन्ही गंभीर जखमी तरुणांना तातडीने उपचारासाठी देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीसांनी अपघाताचा पंचनामा केला असून याप्रकरणी जखमी तरुण प्रणव भेरे याने देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार (फिर्याद) दिली आहे. त्यानुसार कार चालक जितेश नावडेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे करत आहेत. पाटगाव घाटीतील धोकादायक वळणावर चालकांचे नियंत्रण सुटल्यास असे अपघात होत असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे.