डेगवे जि. प. शाळेचे छप्पर कोसळले

सुदैवाने जीवितहानी टळली

बांदा : प्रतिनिधी

डेगवे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. २ चे छप्पर रविवारी मध्यरात्री अचानक कोसळले. ही घटना रात्रीची घडल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. ऐन पावसाळ्यात छप्पर कोसळल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

सदर शाळेत सध्या केवळ एक विद्यार्थी शिक्षण घेत असून नियमित शैक्षणिक कामकाज सुरू आहे. मात्र छप्पर कोसळल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. शाळेची इमारत धोकादायक झाल्याने विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करून इमारतीची तातडीने तांत्रिक तपासणी करण्यात यावी. तसेच आवश्यक निधी उपलब्ध करून नव्याने दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

या घटनेमुळे जिल्ह्यातील जुन्या आणि जीर्ण झालेल्या शालेय इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. शिक्षण विभागाने तातडीने सर्व शाळांची संरचनात्मक तपासणी करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे जि. प. सदस्य नितीन राऊळ यांनी सांगितले.