कोकण बोर्डाचा पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; गतवर्षीच्या तुलनेत निकालात मोठी घट

रत्नागिरी :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या कोकण विभागीय मंडळ, रत्नागिरीचा इयत्ता १० वी आणि १२ वीचा जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवार, दिनांक १४ जुलै २०२६ रोजी दुपारी ०१:०० वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या पुरवणी परीक्षेत इयत्ता १० वीचा एकूण निकाल १२.२६% लागला असून, इयत्ता १२ वीचा निकाल २०.९०% लागला आहे. मागील वर्षाच्या (जून-जुलै २०२५) तुलनेत यंदा दोन्ही इयत्तांच्या निकालात मोठी घट झाली आहे. १० वीच्या निकालात १५.३९% तर १२ वीच्या निकालात ११.१५% टक्केने घट नोंदवली गेली आहे.
यंदाच्या परीक्षेत दोन्ही इयत्तांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. इयत्ता १० वी मध्ये प्रविष्ट झालेल्या १९९ मुलांपैकी केवळ १८ मुले (०९.०४%) उत्तीर्ण झाली, तर ७० मुलींपैकी १५ मुली (२१.४२%) उत्तीर्ण झाल्या आहेत. तसेच १२ वी मध्ये प्रविष्ट झालेल्या ४८४ मुलांपैकी ८७ मुले (१७.९७%) आणि २०० मुलींपैकी ५६ मुली (२८.००%) उत्तीर्ण झाल्या आहेत. १० वीच्या जिल्हानिहाय निकालाचा विचार केला असता, रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल १६.२०% तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ०४.४४% लागला आहे. १२ वी मध्ये मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याने बाजी मारली असून तेथील निकाल २४.६७% लागला आहे, तर रत्नागिरी जिल्ह्याचा १२ वीचा निकाल १९.८१% लागला आहे. १२ वीच्या शाखानिहाय निकालामध्ये सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा (३४.०८%) लागला असून, वाणिज्य शाखेचा १५.६४%, कला शाखेचा १३.४४% आणि व्यावसायिक शाखेचा निकाल ०८.३३% लागला आहे, तर टेक्निकल शाखेचा निकाल शून्य टक्के लागला आहे.
यंदाची लेखी परीक्षा १६ जून ते ३० जून २०२६ (१० वी) आणि १६ जून ते ०८ जुलै २०२६ (१२ वी) या कालावधीत पार पडली. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर एकही गैरमार्ग (कॉपी) प्रकार आढळून आला नाही, मात्र परीक्षोत्तर कालावधीत १० वी मध्ये ०४ तर १२ वी मध्ये ०१ गैरमार्ग प्रकरण निदर्शनास आले आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा सर्व ११ परीक्षा केंद्रांवर व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे अनिवार्य करण्यात आले होते. निकालानंतर ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती हव्या आहेत, त्यांना बुधवार दि. १५ जुलै २०२६ ते शुक्रवार दि. २४ जुलै २०२६ पर्यंत मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी आधी छायाप्रत घेणे अनिवार्य असून, ती मिळाल्यापासून पुढील ५ कार्यालयीन दिवसांत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व प्र. विभागीय सचिव प्रेरणा शिंदे यांनी हार्दिक अभिनंदन केले असून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.