घरासह अन्य जागांची पाहणी करत जाणून घेतली इत्यंभूत माहिती
अन्यही काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता
सावंतवाडी : माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने दिलेल्या तक्रारीनंतर अघोरी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या कोलगाव येथील फिरोज शेख उर्फ फिरोज बाबा याला ठाणे पोलिसांनी अटक केले होते. आज बुधवारी त्याला सोबत घेऊन ठाणे पोलिसांचे पथक पुन्हा एकदा कोलगाव येथे दाखल झाले. त्यांनी बाबाचे राहते घर तसेच जादूटोणा करण्यासाठी वापरत असलेल्या अन्य जागांची प्रत्यक्ष पाहणी करत तो नेमके काय काय करत असे ते सर्व जाणून घेतले. सलग दोन दिवस ठाणे पोलीस पथके त्याच्या घराची झाडाझडती घेत असल्याने मोठे धागेदोरे मिळाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उबाठा गटाचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या जादूटोणा आणि कथित अघोरी प्रथांच्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणाचा तपास कमालीचा वेगवान झाला आहे. ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाने या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी भोंदू फिरोज बाबा शेख याच्या सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील घराची मंगळवारी कसून झाडाझडती घेतली होती. त्यानंतर या अघोरी कृत्यात फिरोज बाबाला साथ देणाऱ्या त्याचा मुख्य साथीदार राम यल्लाप्पा वडार यालाही पोलिसांनी कोलगाव येथून ताब्यात घेत अटक केली होती. चौकशीत राम वडार याने गुन्ह्याची कबुली दिली होती.
त्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा ठाणे पोलिसांच्या पथकाने कोलगाव येथे दाखल होत स्थानिक पोलिसांच्या मदतीने कोलगाव येथील फिरोज बाबाच्या घराची तसेच तो जे प्रकार करीत होता त्यासाठी वापरत असलेल्या सर्व जागांची झाडाझडती घेतली. तसेच त्याच्याकडून कोणत्या जागी नेमके कोणते प्रकार करीत होता याचीही इत्यंभूत माहिती जाणून घेतली. त्यानंतर पोलीस पथक पुन्हा ठाण्याच्या दिशेने रवाना झाले.
या प्रकरणात माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. त्याच तपासाचा एक भाग म्हणून ठाणे पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. या अघोरी आणि जादूटोणा प्रकरणात आणखी काही बड्या लोकांचा सहभाग आहे का, तसेच फिरोज बाबाला या प्रकरणी पडद्यामागून अन्य कोणी मदत केली होती का ? खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबीयांना त्याच्यापर्यंत कोण घेऊन आले ? यात काही राजकीय लोकांचा सहभाग आहे का ?
याचाही शोध आता ठाणे पोलीस घेत आहेत. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणाची व्याप्ती वाढून आणखी काही धक्कादायक खुलासे होऊन काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












