पंचायत समिती सदस्या ऋतिका नाईक यांची तहसीलदारांकडे तक्रार
बांदा : प्रतिनिधी
बांदा शहरातील तलाठी कार्यालयामध्ये सर्कल (मंडळ) अधिकारी व संबंधित कर्मचारी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना विविध महसुली कामांसाठी नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत. या गंभीर बाबीची दखल घेत बांदा पंचायत समिती सदस्या सौ. ऋतिका नाईक यांनी सावंतवाडीचे तहसीलदार यांच्याकडे पत्राद्वारे लेखी तक्रार केली आहे. याप्रकरणी तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. गरज भासल्यास दुसऱ्या कर्मचाऱ्याची तातडीने नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनातम्हटले आहे की, बांदा हे परिसरातील महत्त्वाचे केंद्र असून येथील तलाठी कार्यालयात दररोज अनेक नागरिक, शेतकरी विविध दाखले, सातबारा व महसुली कामांसाठी येत असतात. मात्र, या कार्यालयात सर्कल अधिकारी आणि संबंधित कर्मचारी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याचे समोर आले आहे.
अधिकारी जागेवर उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना साध्या कामांसाठीही वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या जनतेचा वेळ आणि नाहक आर्थिक खर्च होत आहे.
या त्रासातून नागरिकांची सुटका करण्यासाठी तहसीलदारांनी संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांना नियमित उपस्थित राहून नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत निर्देश द्यावेत किंवा दुसऱ्या सक्षम कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी सौ. नाईक यांनी केली आहे. यावेळी बांदा ग्रा. पं. सदस्य साई काणेकर, ओंकार नाडकर्णी, भाऊ वाळके उपस्थित होते.













