खेड :
खेड महावितरण कार्यालयात स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये असलेल्या गैरसमजांचे निरसन करण्यासाठी विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता श्री. बाबरेकर यांनी स्मार्ट मीटरमध्ये कोणताही छुपा कॅमेरा नसल्याचे स्पष्ट केले. स्मार्ट मीटरमध्ये केवळ कम्युनिकेशन पोर्ट असून, त्याचा वापर मीटरमधील माहिती घेण्यासाठी आणि आवश्यक अपडेट करण्यासाठी केला जातो, असे त्यांनी सांगितले.
तसेच, वीज बिल जास्त येण्यास स्मार्ट मीटरला जबाबदार धरता येणार नाही. स्मार्ट मीटर हे केवळ वीज वापराचे अचूक मोजमाप करणारे आधुनिक उपकरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक ग्राहकांना महाराष्ट्र वीज नियामक आयोग अर्थात एमईआरसीच्या वीजदरांतील बारकावे माहिती नसल्याने गैरसमज निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
घरगुती ग्राहकांना कमी वीजदराचा लाभ तसेच व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांना टॅरिफ बेनिफिट मिळण्यासाठी स्मार्ट मीटर उपयुक्त ठरणार असून, जुन्या मीटरमध्ये हे लाभ मिळणार नाहीत, असेही बाबरेकर यांनी सांगितले. त्यामुळे स्मार्ट मीटरबाबत घाबरण्याचे कोणतेही कारण नसून, इतर आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणेच हीदेखील वीज मोजण्याची नवी आणि विश्वासार्ह तंत्रज्ञान प्रणाली असल्याचे महावितरणने नागरिकांना आवाहन केले.












