प्रशांत यादव यांची सांस्कृतिक कार्यमंत्री ना. आशिष शेलार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
चिपळूण (प्रतिनिधी) : कोकणातील नमन व जाखडी लोककलावंतांसाठी मुंबई येथे सर्व सुविधांनी सुसज्ज “लोककलावंत भवन” उभारावे. जेणेकरून लोककलावंतांची मुंबईतील निवासाची होणारी अडचण दूर होण्यास मदत होईल, अशी मागणी भाजपा दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी माहिती व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यानुसार कोकणची ओळख असलेल्या नमन आणि जाखडी या लोककला केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून, त्या महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा आणि कोकणच्या अस्मितेचा जिवंत वारसा आहेत. या लोककलांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचे महान कार्य हजारो लोककलावंत अनेक दशकांपासून अत्यंत निष्ठेने करीत आहेत. आपण नमन व जाखडी पथकांना रु. ५० हजार रूपये अनुदान देण्याबाबत केलेली ऐतिहासिक घोषणा ही या लोककलावंतांच्या कलेचा गौरव करणारी आणि त्यांच्या आयुष्याला मोठा आधार देणारी ठरली आहे. या संवेदनशील निर्णयाबद्दल संपूर्ण कोकणातील लोककलावंत आपले ऋणी आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच संपूर्ण कोकणातील नमन व जाखडी पथके वर्षभर मुंबई आणि उपनगरांमध्ये विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जात असतात. मात्र, मुंबईसारख्या महानगरात त्यांच्यासाठी परवडणारी, सुरक्षित व सन्मानजनक निवास व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे अनेक कलाकारांना रात्रभर जागरण करावे लागते, अतिरिक्त खर्च सहन करावा लागतो किंवा अत्यंत गैरसोयीच्या परिस्थितीत मुक्काम करावा लागतो. या परिस्थितीचा त्यांच्या सन्मानावर तसेच कलेवरही विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे मुंबई येथे कोकणातील नमन, जाखडी तसेच इतर पारंपरिक लोककलावंतांसाठी सर्व सुविधांनी युक्त “लोककलावंत भवन” उभारण्यात आल्यास कलावंतांची मोठी अडचण दूर होऊ शकेल.
एकावेळी किमान ५० ते १०० लोककलावंतांच्या निवासाची व्यवस्था असावी, परवडणारे भोजनगृह व स्वच्छ भोजन व्यवस्था, सरावासाठी सुसज्ज सभागृह (रिहर्सल हॉल), वाये, वेशभूषा व साहित्य ठेवण्यासाठी सुरक्षित संग्रह कक्ष, स्नानगृह, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी व इतर मूलभूत सुविधा, ऑनलाइन किंवा दूरध्वनीद्वारे आरक्षणाची सुलभ व्यवस्था, लोककला प्रशिक्षण, कार्यशाळा व सांस्कृतिक उपक्रमांसाठी बहुउद्देशीय सभागृह यांचा समावेश असलेले “लोककलावंत भवन” उभारल्यास हजारो लोककलावंतांना मोठा दिलासा मिळेल. तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचे जतन, संवर्धन आणि नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे हस्तांतरण करण्यासाठीही हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरेल. आपल्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक निर्णय झाल्यास महाराष्ट्रातील लोककलावंतांच्या इतिहासात तो सुवर्णाक्षरांनी नोंदविला जाईल. तरी आपण या मागणीचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे या निवेदनात यादव यांनी नमूद केले आहे.













