खेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील गुणदे येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित सदगुरू काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे व गुरुकुल विद्यामंदिर गुणदे व अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठान गुणदे संचलित मातोश्री अनुसया (माई) आंब्रे स्मार्ट स्कूल गुणदे (मम्मास) प्रशालांमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृष्णा अँटीऑक्सिडेंटस प्रा.लि.लोटे कंपनीचे जनरल मॅनेजर एस.एम. पाटील यांच्या हस्ते गणेशपूजन, सहकारी शुभम कदम यांच्या हस्ते सरस्वती पूजन व सरस्वती शिक्षण संस्थेचे शाळा समिती व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भास्कर आंब्रे यांच्या हस्ते गुरुपूजन करण्यात आले. त्यानंतर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी जोशी व गुणदे केंद्राचे केंद्रप्रमुख अजित पाटील व त्यांच्या पत्नी सौ. पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हस्ते गणपती व दुर्गा मातेची आरती करण्यात आली. कृष्णा अँटीऑक्सिडेंटसचे श्री. पाटील यांच्याकडून संस्थेस सोलर सुविधेसाठी भरीव मदत केल्याबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेतर्फे श्री. पाटील व त्यांचे सहकारी श्री. शुभम कदम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गुणदे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. पाटील यांचाही सपत्नीक शाल व नारळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी वेगवेगळी वेशभूषा केलेली चिमुकली बालके दांडियाचे आकर्षण बनली होती. नर्सरीपासून ते १० वी पर्यंतचे सर्वच विद्यार्थी दांडियामध्ये आनंदाने नाचत होते. विविध गाण्यांच्या तालावर विद्यार्थ्यांनी गरबा नृत्य केले. सरस्वती शिक्षण संस्थेचे चेअरमन विक्रांत आंब्रे, व्हा. चेअरमन अरविंद आंब्रे, सचिव राजेंद्र आंब्रे, शाळा समिती व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भास्कर आंब्रे, संचालक विष्णुपंत आंब्रे, प्रकाश आंब्रे व इतर सहकारी संचालक यांनी विद्यार्थ्यांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी सदगुरू काडसिद्धेश्वर विद्यालय, गुणदेच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी जोशी, गुरुकुल विद्यामंदिर, गुणदेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. अनिता विचारे तसेच मम्मासच्या मुख्याध्यापिका सौ. पूर्वा माने व सर्व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.












