बेलाचीवाडी येथील कुटुंबाला शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत यांचा मदतीचा हात
छप्पराच्या दुरुस्तीसाठी आवश्यक सर्व साहित्य स्वखर्चातून केले उपलब्ध
मालवण | प्रतिनिधी : वादळी वाऱ्यांत घरावर झाड कोसळून छप्पर कोसळलेल्या बेलाचीवाडी येथील अनिल राघो परब कुटुंबाला मालवण तालुका शिवसेनेने हक्काचा ‘आधार” दिला आहे. नुकसानग्रस्त परब कुटुंबाला शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत यांनी मदतीचा हात देताना छप्पर दुरुस्तीसाठी आवश्यक सर्व साहित्य स्वखर्चातून उपलब्ध केले आहे. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनानुसार सामाजिक व कौटुंबिक भावनेतून मदतकार्य केल्याचे तालुकाप्रमुख विनायक बाईत यांनी सांगितले.
मालवण तालुक्यातील बेलाची वाडी येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनिल राघो परब यांच्या राहत्या घरावर सागाचे झाड कोसळून घराचे छप्पर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. या घटनेची तातडीने दखल घेत शिवसेना मालवण उप तालुकाप्रमुख जितेंद्र (बाबू) परब यांनी अनिल कांदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत घरावरील झाड हटवून अनिल परब यांना संकटातून बाहेर काढले.
याबाबत माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुका प्रमुख विनायक बाईत आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानुसार तालुका प्रमुख विनायक बाईत यांनी स्वखर्चातून घराच्या छप्पराच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य उपलब्ध करून दिले. त्यामुळे उद्ध्वस्त झालेले छप्पर आता पुन्हा पूर्ववत करण्यात येणार आहे.
यावेळी तालुका प्रमुख विनायक बाईत म्हणाले, “शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारधारेनुसार आम्ही कार्य करत आहोत. आमदार निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनातून जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होत, मदत करण्याचा आमचा प्रयत्न असतो, त्याच भावनेतून कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या विभागात काम करतं असताना माजी बांधकाम सभापती व ज्येष्ठ शिवसेना कार्यकर्ते अनिल कांदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने परिसरातील जनतेला विविध प्रसंगी न्याय व दिलासा देण्याचे कार्य शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी तालुका प्रमुख विनायक बाईत यांच्यासह पंचायत समिती सदस्य तथा शिवसेना गटनेते संजय (छोटू) ठाकूर, उपतालुका प्रमुख जितेंद्र परब, विभागीय अध्यक्ष प्रशांत परब, प्रवक्ते निलेश बाईत, विभागीय सचिव मंगेश यादव, मसुरे विभाग अल्पसंख्याक प्रमुख इस्माईल शेख, मालोंड-बेलाची वाडी उपसरपंच लक्ष्मण चव्हाण, माजी सरपंच हेमंत पारकर, माजी उपसरपंच नाना परब, माजी सरपंच सुभाष परब, संदीप परब, दिलीप परब, स्वप्नील दळवी तसेच घरमालक अनिल परब उपस्थित होते.












