नगरपंचायतीच्या सभेत ठराव मंजूर
नगरसेवक राकेश राणे यांनी मांडला ठराव
कणकवली : कणकवली – ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी मिळाल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचे अभिनंदन करणारा ठराव कणकवली नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. हा अभिनंदनाचा ठराव नगरसेवक राकेश राणे यांनी सभागृहात मांडला.
यावेळी बोलताना नगरसेवक राकेश राणे यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनधारकांना टोलमाफी देण्याचा निर्णय हा सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी, विद्यार्थी तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो वाहनधारकांचा आर्थिक भार कमी होणार असून त्यांच्या प्रवासालाही मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
सभेत उपस्थित सर्व सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत करत पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गवासीयांच्या हिताचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच टोलमाफीचा हा निर्णय जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा आणि स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले.













