आठवडा बाजारात शिवाजीपथ परिसरात रस्त्यावर बसण्यास व्यापाऱ्यांना प्रतिबंध

व्यापारी व भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली नगराध्यक्षांची भेट
न. प. च्या कौन्सीलमध्ये चर्चा करून निर्णय घेऊ नगराध्यक्षा अ‍ॅड. हुस्नबानू खलिफेंची ग्वाही

राजापूर प्रतिनिधी : राजापूर शहरातील आठवडा बाजाराला शिस्त लावण्यासाठी शिवाजीपथ मार्गावरील बंदरधक्का ते वैशंपायन गुरूजी पुलापर्यंत व्यापाऱ्यांना बसण्यास प्रशासनाने मज्जाव केल्याने आठवडा बाजारातील व्यापारी व भाजपाच्या शिष्टमंडळाने गुरूवारी नगराध्यक्षा अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांची भेट घेतली. यावेळी व्यापाऱ्यांनी आंम्हाला या भागात बसण्याची मुभा द्यावी अशी मागणी केली. यावर नगराध्यक्षा अ‍ॅड. खलिफे यांनी पुढील सभेत याबाबत निर्णय घेवून आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांसह ग्राहक, नागरीक यांची गैरसोय होणार नाही, अशापकारे बाजाराचे नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
राजापूर शहरातील गणेश विसर्जन घाट ते शिवाजीपथ मार्गावर दर गुरूवार आठवडा बाजार भरविण्यात येतो. मात्र मागील दोन आठवडा बाजारापासून नगरपरिषद प्रशासनाने गणेशघाटापासून ते वैशंपायन गुरूजी पुलापर्यंत रस्त्यावर व्यापाऱ्यांना बसण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे अखेर गुरूवारी आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांनी नगरपरिषदेत धडक देत नगराध्यक्षांसमोर आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपाचे तालुकाध्यक्ष मोहन घुमे, श्रृती ताम्हणकर, सुशांत मराठे, माजी नगरसेविका शितल पटेल, मनिषा मराठे आदी उपस्थित होते.
यावर नगराध्यक्षा अ‍ॅड. खलिफे यांनी व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आठवडा बाजारात या भागात रस्त्यावर मांडण्यात येणाऱ्या दुकांनांमुळे होणारी वाहतूक कोंडी याबाबत नागरीकांच्या वारंवार तकारी येत असल्याने व आठवडा बाजाराला शिस्त लावण्यासाठी सभागृहात हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यामुळे व्यापाऱ्यांची गैरसोय होत असल्यास व्यापाऱ्यांसोबता ग्राहक आणि नागरीकांचे हित विचारात घेऊन आठवडा बाजाराचे सुयोग्य नियोजन केले जाईल. सोमवारी होणाऱ्या कौन्सीलच्या बैठकीत याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही व्यापारी व शिष्टमंडळातील पदाधिकारी यांना दिली.
यावेळी उपनगराध्यक्ष विनय गुरव, काँग्रेसचे गटनेते अ‍ॅड.जमीर खलिफे, शिवसेना गटनेते अ‍ॅड.राहूल तांबे, नगरसेवक सौरभ खडपे, दिलीप अमरे, दिलीप चव्हाण, सुभाष बाकाळकर, उर्मिला बाकाळकर, प्रेरणा नार्वेकर, सौरभ पेणकर तसेच कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र जाधव उपस्थित होते.