अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा
चिपळूण :
सावर्डे येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रामध्ये एका वृद्ध व्यक्तीला पैशांचे आमिष दाखवून आणि एटीएम कार्ड बदलून २० हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोसबी मुंढे, लांबेवाडी येथील रहिवासी असलेले ७२ वर्षीय वृद्ध सिताराम तुकाराम लांबे हे सावर्डे येथील एसबीआय एटीएममध्ये आपल्या खात्यावरील पैसे काढण्यासाठी गेले होते. ते मशीनमधून पैसे काढत असताना, तिथे आलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांना मदत करण्याचा बहाणा केला. ‘मी तुम्हाला पैसे काढून देतो’ असे सांगून त्याने लांबे यांचे एटीएम कार्ड हातात घेतले आणि पासवर्ड चोरून पाहिला. त्यानंतर अत्यंत हातचलाखीने त्याने लांबे यांचे मूळ एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून घेतले आणि त्यांना दुसरेच एक कार्ड हातात टेकवले. लांबे यांना हा प्रकार न समजल्याने ते तिथून निघून गेले. याचाच फायदा उठवत त्या अज्ञात चोरट्याने लांबे यांच्या एटीएम कार्ड आणि पासवर्डचा वापर करून त्यांच्या बँक खात्यातून एकूण २० हजार ७०० रुपये काढून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सिताराम लांबे यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.













