३० लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील तिन्ही आरोपींना जामीन; ॲड. विवेक मांडकुलकर यांच्या युक्तिवादाला यश

कुडाळ :ओरोस येथील गोवा–मुंबई राष्ट्रीय महामार्गावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) ३० लाख १३ हजार ४५० रुपयांच्या प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीप्रकरणी अटक केलेल्या तिन्ही आरोपींना मे. विशेष जिल्हा न्यायाधीश-१ यांनी जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर तसेच कायदेशीर अटी-शर्तींसह आरोपींची मुक्तता करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. विवेक भालचंद्र मांडकुलकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. प्रणाली मोरे, ॲड. विनय मांडकुलकर, ॲड. वृषांग जाधव आणि ॲड. सुयश गवंडे यांनी सहकार्य केले.

एलसीबीचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले यांच्या पथकाने ओरोस–कसाल राष्ट्रीय महामार्गावर गस्तीदरम्यान ‘खालसा पंजाबी ढाबा’ परिसरात संशयास्पदरीत्या जात असलेले अशोक लेलँड कंपनीचे ‘बडा दोस्त’ (एमएच ०८ एपी ९४१७) हे वाहन अडवून तपासणी केली होती. तपासणीत वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आले.

या कारवाईत २१ लाख ६३ हजार ४५० रुपयांचा प्रतिबंधित माल तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले ८ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले होते. एकूण ३० लाख १३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला होता.

या प्रकरणात गोपाळ राजाराम गवस (रा. दापोली-अन्नपूर्णावाडी, सावंतवाडी), शिरीष सुभाष गवळी (रा. माठेवाडा, सावंतवाडी) आणि सिद्धेश सुनील केसरकर (रा. आळवाडो, बांदा) या तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध सिंधुदुर्गनगर (ओरोस) पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने जप्ती प्रक्रियेतील कायदेशीर बाबींसह आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचा आणि तपासात सहकार्य करण्याची तयारी असल्याचा मुद्दा न्यायालयासमोर मांडला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना अटींसह जामीन मंजूर केला.