दोडामार्ग: प्रतिनिधी
राष्ट्रीय किसान दिनाचे औचित्य साधून बँक ऑफ इंडिया, शाखा दोडामार्ग येथे शेतकऱ्यांचा विशेष सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचा मुख्य कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या अफाट मेहनतीला सलाम करण्यासाठी बँकेच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात परिसरातील अनेक प्रगतशील शेतकऱ्यांना आमंत्रित करून त्यांचा गौरव करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते गौरव
या सत्कार प्रसंगी बँक ऑफ इंडिया दोडामार्ग शाखेचे कर्मचारी श्री. करणम नंदकिशोर, श्री. शुभम दीपक गावडे आणि दोडामार्ग विकास सोसायटीचे अध्यक्ष श्री. सुचन वसंत कोरगावकर यांनी उपस्थित मान्यवरांसमवेत शेतकऱ्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले.
“शेतकरी हा देशाचा खऱ्या अर्थाने आधार आहे. बँक ऑफ इंडिया शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. किसान क्रेडिट कार्ड (KCC), पीक विमा योजना आणि शासनाच्या इतर विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत,” असा विश्वास यावेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बोलताना व्यक्त केला.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकरी बांधवांना बँकेच्या विविध शेती कर्ज योजना, आधुनिक डिजिटल व्यवहार आणि विमा संरक्षणाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बँकेने सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थित शेतकऱ्यांनी भरभरून कौतुक केले. या सत्कार सोहळ्यास बँकेचे इतर कर्मचारी आणि दोडामार्ग परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.













