विजयदुर्ग (प्रतिनिधी ) : विजयदुर्ग येथील श्रीदेव विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्ये बुधवार, दि. २२ जुलै ते बुधवार, दि. २९ जुलै २०२६ या कालावधीत वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा होत आहे. या सप्ताहामध्ये गावातील चौगचारवाडी, चाफेगल्ली, विठ्ठलवाडी, वाडये परिवार, भानुदास, महिला मंडळ आणि गोपाळकृष्णवाडी अशा सातही वाड्यांचे प्रहर आयोजित करण्यात आले असून आठही दिवस अखंड हरिनाम, भजन, कीर्तन आणि विठ्ठलनामाच्या गजरात धार्मिक कार्यक्रम पार पडत आहे. शनिवार दि. २५ जुलै रोजी दरवर्षीप्रमाणे पारंपरिक नारुची दिंडी उत्साहात काढण्यात येणार आहे. गावातील गाबीत समाज पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन मंदिरात आगमन करणार आहे.
यावर्षी गोपाळकृष्ण वाडीची दिंडी असल्याने प्रथमच गोपाळकृष्णवाडी आपल्या वाडीचा आकर्षक देखावा (सीन) या दिंडीत सादर करणार असून, यामुळे दिंडीचे विशेष आकर्षण वाढणार आहे. यंदाच्या हरिनाम सप्ताहाचे उत्सवमूर्तीपद गोपाळकृष्णवाडीला लाभले असून, त्यांच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या आठ दिवसीय हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवार, दि. २९ जुलै रोजी श्री विठ्ठल-रखुमाई यांच्या भव्य पालखी सोहळ्याने तसेच पारंपरिक दहीहंडी उत्सवाने करण्यात येणार आहे.
या पवित्र धार्मिक सोहळ्यास समस्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री विठ्ठल-रखुमाईंचे दर्शन घेऊन धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव विठ्ठल-रखुमाई मंदिर, विजयदुर्ग समितीचे अध्यक्ष महेश बिड्ये यांच्यावतीने करण्यात आले आहे.











