मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील दिवा ते रोहा दरम्यान रेल्वे गाड्यांच्या वेळेत फेरबदल (Reschedule) आणि काही गाड्या रोखून धरण्याचा (Regulate) निर्णय घेण्यात आला आहे. कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी यासंदर्भात पत्रकाद्वारे सविस्तर माहिती दिली आहे. या तांत्रिक कामांमुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांवर परिणाम होणार आहे.
गाड्यांच्या रेग्युलेशननुसार, मंगळवार, दिनांक २१ जुलै २०२६ रोजी मडगाववरून सुटणारी गाडी क्रमांक २०११२ मडगाव ते मुंबई सीएसएमटी कोकणकन्या एक्सप्रेस तळोजे पंचनंद स्थानकावर ८० मिनिटे रोखून धरली जाईल. याच दिवशी सावंतवाडीहून सुटणारी गाडी क्रमांक ११००४ सावंतवाडी रोड ते दादर तुतारी एक्सप्रेस कळंबोली गुड्स शेड येथे ३५ मिनिटे रोखून धरली जाणार आहे. तसेच, गाडी क्रमांक १२६२० मंगळुरू सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस २१ जुलै रोजी पनवेल स्थानकात १० मिनिटे थांबवून ठेवली जाईल.
दुसरीकडे प्रवासाच्या वेळेत फेरबदल करण्यात आलेल्या गाडीमध्ये मांडवी एक्सप्रेसचा समावेश आहे. बुधवार, दिनांक २२ जुलै २०२६ रोजी मुंबई सीएसएमटी येथून सुटणारी गाडी क्रमांक १०१०३ मुंबई सीएसएमटी ते मडगाव जंक्शन मांडवी एक्सप्रेस तिच्या निर्धारित वेळेपेक्षा ९० मिनिटे (१ तास ३० मिनिटे) उशिराने, म्हणजेच सकाळी ०८:४० वाजता सुटेल.
या बदलांमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता रेल्वे प्रशासनातर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात आली असून, सर्व प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी गाड्यांच्या या बदलेल्या वेळेची योग्य ती नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.











