नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांनी मानले
पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांचे आभार
लांजा (प्रतिनिधी ) : लांजा नगरपंचायतीच्या ६५.७७ कोटींचा महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा व प्रयत्न केल्या बद्दल पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांचे लांजा नगरपंचायतीच्या लोकप्रतिनिधींनी त्यांची पाली येथे सदिच्छा भेट घेत आभार मानले.
केंद्र सरकारच्या अमृत २.० अभियानांतर्गत नगरविकास विभागाने या निधीची मंजुरी दिली असून प्रकल्पाचे काम १२ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. लांजा शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन या योजनेची आखणी करण्यात आली आहे.
सदर प्रकल्पामुळे लांजा शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि शाश्वत होणार असून नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत लांजा शहरासाठी आधुनिक जलपुरवठा व्यवस्था विकसित करण्यात येणार आहे. त्यामध्ये पन्हळे धरण आणि बेनी नदी येथून कच्च्या पाण्याचे उपसा केंद्र, नवीन जॅकवेल, पंपगृह, कच्च्या पाण्याची वाहिनी, ९ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प, विविध जलसाठे, उंच जलकुंभ, वितरण व्यवस्था, सौर ऊर्जा प्रकल्प, रस्त्यांची पुनर्बांधणी तसेच आवश्यक पूरक सुविधा उभारण्यात येणार आहेत.
प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सुमारे ८६.३७ किलोमीटर लांबीची नवीन पाणी वितरण वाहिनी उभारण्यात येणार आहे. याशिवाय सात नवीन उंच व जमिनीवरील जलसाठे, फीडर मेन, विविध झोनसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा व्यवस्था आणि २४५ केडब्ल्यूपी क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचाही समावेश आहे.
दरम्यान, लांजा नगरपंचायतीचा पाणीपुरवठा प्रकल्पाच्या मंजुरीसाठी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे निधी मंजूर झाला आहे. याबाबत लांजाच्या नगराध्यक्ष सावली कुरूप, उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, नगरसेवक तथा गटनेते योगेश कावतकर, पाणी सभापती रफिक नेवरेकर, पंढरीनाथ मायशेट्ये, मनोहर बाईत, सचिन डोंगरकर, वैभव जोईल, सिद्धेश भुवड तसेच नगरसेविका निधी गुरव, श्रद्धा तोडकरी, प्रांजल यादव, प्रणाली तेली, निलिमा कनावजे, साक्षी मानकर, दुर्वा भाईशेट्ये यांनी पाली येथील निवासस्थानी पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांची सदिच्छा भेट घेत शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.












