स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स टी-शर्ट, पॅन्ट व खाऊचे वाटप
अंगणवाडीसाठी शैक्षणिक भित्तीपत्रकांची भेट
कणकवली : मुलांना दर्जेदार शिक्षणासोबतच क्रीडा आणि संस्काराची संधी मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. शिक्षणाची खरी पायाभरणी अंगणवाडीपासून सुरू होते. त्यामुळे लहान वयातच मुलांना आनंददायी, आकर्षक आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. समाजातील प्रत्येकाने शिक्षण क्षेत्राला हातभार लावला, तर सक्षम आणि सुशिक्षित पिढी घडण्यास निश्चितच मदत होईल. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी शिक्षणाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी उपयुक्त ठरणारे उपक्रम राबविणे, हीच त्यांना खरी आदरांजली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले.
उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेतर्फे शहरातील शाळा क्रमांक ५ येथे विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स टी-शर्ट व स्पोर्ट्स पॅन्टचे वाटप करण्यात आले. तसेच अंगणवाडी वर्गखोलीसाठी शैक्षणिक उपक्रमांची माहिती देणारी भित्तीपत्रके देऊन बालशिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
येथील शाळा क्रमांक ५ मध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. हुमेरा अबिद नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कणकवली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर, शहराध्यक्ष इम्रान शेख, उपाध्यक्ष सचिन अडुळकर, मुख्याध्यापिका कल्पना मलये, उज्वला जावडेकर, केतकी दळवी, अंगणवाडी सेविका स्वाती पोयेकर तसेच पालकवर्ग उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जनसेवा सप्ताह’ साजरा करण्यात येत असून, त्याअंतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात महिला, युवा वर्गासाठीच्या कार्यक्रमांचा समावेश आहे. तसेच आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमांतर्गत शाळा क्रमांक ५ येथे ५५ विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स टी-शर्ट व स्पोर्ट्स पॅन्टचे वाटप करण्यात आले. तसेच शाळा व अंगणवाडीतील मुलांना खाऊचे वितरण करण्यात आले. अंगणवाडी इमारतीच्या भिंती बोलक्या असाव्यात, विद्यार्थ्यांना चित्रांच्या माध्यमातून हसत-खेळत शिक्षण घेता यावे, या उद्देशाने शैक्षणिक माहितीपर भित्तीपत्रके वर्गखोलीत लावण्यात आली. यावेळी अॅड. समृद्धी जैतापकर यांनी एलएलएम पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला













