‘ज्ञानोबा-तुकाराम’ नामघोषात रत्नागिरीत रंगणार आषाढी वारी

रत्नागिरी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त रत्नागिरी शहरात आयोजित करण्यात आलेल्या आषाढी वारीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा, भक्ती, समता, सेवा आणि समाजातील ऐक्याचा संदेश जपणारी ही वारी शनिवारी, २५ जुलै रोजी सकाळी ६.३० वाजता मारुती मंदिर सर्कल येथून प्रारंभ होणार असून मारुती मंदिर ते श्री विठ्ठल मंदिर असा वारीचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

“वारी ही फक्त चालण्याची परंपरा नसून प्रेम, समता, सेवा आणि भक्तीचा उत्सव आहे,” असा संदेश देत आयोजकांनी सर्व रत्नागिरीकरांना या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “ज्ञानोबा-तुकाराम” यांच्या नामघोषात, “माऊली… माऊली…” च्या गजरात विठुरायाच्या भेटीसाठी निघणाऱ्या या वारीत जात, धर्म, पंथ, वय आणि व्यवसायाच्या सर्व सीमा विसरून सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

वारीत सहभागी होणे म्हणजे विठुरायाच्या चरणी भक्ती अर्पण करण्याबरोबरच आपल्या संस्कृतीची परंपरा जपणे, समाजात प्रेम व एकतेचा संदेश देणे आणि पुढील पिढीला वारकरी संस्कारांची ओळख करून देणे होय, असे आयोजकांनी नमूद केले आहे. त्यामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच लहान मुलांसह मोठ्या संख्येने या वारीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“झडो भेद सारा, प्रेम वसे अंतरी… जोडू समाज अवघा, भेटे तेथीच हरी!” या संतवचनाचा संदेश घेऊन रत्नागिरीची आषाढी वारी अधिक भव्य, दिव्य आणि भक्तिमय करण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या वारीचे आयोजन हनुमान मंदिर, सडा (मारुती मंदिर), रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आले असून, या भक्तिमय सोहळ्याची सांगता श्री विठ्ठल मंदिरात होणार आहे. “राम कृष्ण हरी” आणि “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल” या नामघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले आहे.