चिपळूण शहरातील खड्डे, रस्त्यांवरील अतिक्रमणे, आरक्षण आदी मुद्द्यांवर सभा गाजली

चिपळूण नगर परिषदेची सर्वसाधारण सभा

चिपळूण संतोष सावर्डेकर :-शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था या मुद्द्यावर भाजप-शिवसेना उबाठात जोरदार जुंपली. गोवळकोट येथील शाळा व खेळाचे मैदान आरक्षण उठवणे या विषयाला अखेर स्थगिती देण्यात आली. तर शहराच्या मध्यभागी बियर शॉपी ला परवानगी देण्याचा ठराव देखील सभागृहाने फेटाळला व यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना सर्व अधिकार देण्यात आले. एकंदरीत ही सभा तब्बल आठ तास चालली. ही सभा नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत मागासवर्गीय कल्याण विशेष समितीच्या सभापती सौ. निलम जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीबद्दल निलम जाधव यांचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष सौ. रुपाली दांडेकर यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी अभिनंदन केले.

चिपळूण नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी सकाळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या तालीम सभागृहात पार पडली. सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवर तब्बल ५४ विषय असल्याने व त्यातील काही विषय हे थेट सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

सभेच्या सुरुवातीला शहरातील बहादूरशेखनाका येथील चिपळूण नगरपरिषदेच्या आरक्षित जागेतील स्वातंत्र्यवीर सावरकर औद्योगिक लघुक्षेत्रात मार्किंग जागेत वृक्षारोपण, मोकाट गुरे, गाढवे, भटकी कुत्री, शहरात रस्तोरस्ती भाजी, फळ विक्रेते यांचे होत असलेले अतिक्रमण आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.

यावेळी शहरातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आणला. या मुद्द्यावर चर्चा होत असताना भाजपचे गटनेते शशिकांत मोदी यांनी सुवर्ण भास्कर पेट्रोल पंपासमोर पडलेला खड्डा भयानक असून त्यामुळे अनेक जण पडल्याचे नमूद केले. या पेट्रोल पंपांचा सातत्याने उल्लेख केल्याने यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे गटनेते मिथिलेश नरळकर यांनी आक्षेप घेतला. यावर मोदी यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. नरळकर यांनी मोदी यांच्या ज्येष्ठतत्वावर बोट ठेवले तर मोदी यांनी मी चारवेळा नगरसेवक झालो पण मी स्वीकृत म्हणून एकदाही आलो नाही, असे म्हणत नरळकर यांना मागील स्वीकृत नगरसेवक पदावरून डीवचण्याचा प्रयत्न केला. यावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध झाले. अखेर नगराध्यक्ष सकपाळ यांनी यात हस्तक्षेप भरून दोघांनाही समज दिली.

शहरातील गोवळकोट येथील शाळा व मैदानाचे आरक्षण उठवण्याच्या निर्णयाला सभेत कडाडून विरोध झाला. हा विषय शहरात बहुचर्चित बनला आहे. त्यामुळे सभागृह कोणता निर्णय घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हा विषय चर्चेला येताच काँग्रेस नगरसेवक साजिद सरगुरोह व सफा गोठे यांनी शाळा व मैदानाचे आरक्षण उठवण्यास जोरदार विरोध केला. चर्चांअती या विषयाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे सद्या तरी या विषयावर पडदा पडला आहे.

शहरातील एका बिल्डिंगमध्ये बियर शॉपीसाठी नाहरकत देण्याचा विषय समोर येताच जेष्ठ नगरसेवक फैसल कासकर यांनी त्वरित आक्षेप घेत हा विषय प्रशासनाचा आहे. तो सभागृहासमोर का आला.?आमचा या विषयाशी संबंध नाही.असे विषय सभागृहात येताच कामा नये,असे स्पष्ट करत प्रशासनाकडे बोट दाखवले, तर साजिद सरगुरोह यांनी यावेळी मुख्याधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. भाजप गटनेते शशिकांत मोदी यांनी देखील काही मुद्दे उपस्थित करीत विरोध दर्शवित प्रशासनावर विषय ढकलला. तर राष्ट्रवादीच्या नगरसेविका नसरीन खडस यांनी या विषयाला कडाडून विरोध केला. अखेर हा विषय फेटाळण्यात आला व मुंख्याधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले.

लोटे- परशुराम औद्योगिक क्षेत्रातील पाणी टंचाई निवारणासाठी वाशिष्ठी नदीवर तात्पुरत्या स्वरूपात कॉफरडम बांधण्याच्या परवानगीला नगरसेवक साजिद सरगुरोह यांनी विरोध दर्शविला. यामुळे गोवळकोटच्या जॅकवेलला पाणी येणार नाही आणि गोवळकोट भागात पाणी टंचाई निर्माण होईल, असा मुद्दा मांडला. यानंतर सभागृहाने हा विषय फेटाळला. चिपळूण नगरपरिषदेच्या नवीन इमारत बांधकामा संदर्भात व स्थलांतर विषय भाजप गटनेते शशिकांत मोदी यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादीच्या नगरसेविका उमा देसाई यांनी पागमळा येथील विसर्जन घाट बांधकाम करण्याच्या कामाच्या सुचवण्याच्या मुद्द्यावर आपल्या प्रभागात कोणाचाही हस्तक्षेप चालणार नाही असे खडे बोल सुनावले. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उबाठा नगरसेवकांत समन्वयाचा अभाव दिसून आला. तर पाग मळा मारुती मंदिर तसेच पाग पॉवर हाऊस येथील गणेश विसर्जन घाटाच्या अनुषंगाने एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीवरून भाजपचे नगरसेवक तथा आरोग्य समिती सभापती शुभम पिसे व शिवसेना उबाठा नगरसेवक मिथिलेश नरळकर यांच्यात शाब्दिक खडाजंगी उडाली. अखेर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांना या दोघांना शांत करण्याची वेळ आली. एकंदरीत चिपळूण नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेक मुद्द्यांवर नगरसेवकांमध्ये खडाजंगी उडाली. तर काही मुद्द्यांवर एकमत दिसून आले तर काही विषयांना स्थगिती देण्यात आली. यामुळे चिपळूण नगर परिषदेची सभा चांगलीच गाजल्याचे पहावयास मिळाले.