उपसरपंच हेमंत मराठे यांचा उपोषणाचा इशारा
सावंतवाडी: जन्मापासून ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या मोफत आरोग्य तपासणी व उपचारासाठी सुरु असलेला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) मळेवाड-कोंडुरे परिसरात पूर्णपणे कोलमडला असल्याचा आरोप करत, या भोंगळ कारभाराविरोधात मळेवाड-कोंडुरेचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या आरोग्य यंत्रणेत तत्काळ सुधारणा न झाल्यास बालकांसह आणि पालकांसह सिंधूदुर्गनगरी ओरोस येथील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
आरोग्य विभागाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत वर्षातून एकदा अंगणवाडीतील मुलांची तपासणी करणे बंधनकारक असते. हा कार्यक्रम जन्माच्या वेळचे दोष, आजार, शारीरिक कमतरता आणि विकासातील विलंब (4 Ds) या चार प्रमुख घटकांवर आधारित आहे. मात्र, मळेवाड-कोंडुरे गावातील काही अंगणवाड्यांमध्ये गेल्या दीड वर्षापासून आरोग्य तपासणी पथक पोहोचलेलेच नाही. त्यामुळे अनेक बालके आरोग्य तपासणीपासून वंचित राहिली आहेत.
शुक्रवारी मळेवाड येथील दोन अंगणवाड्यांमध्ये तपासणी प्रस्तावित होती. मात्र दुपारचे १२ वाजले तरी तपासणी पथक न पोहोचल्याने उपसरपंच मराठे यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यावर शासकीय गाडी उपलब्ध नसल्याने खाजगी वाहनाने यावे लागते आणि त्यामुळे उशीर झाल्याचे अजब उत्तर पथकातील डॉक्टरांनी दिले. शासकीय गाडीअभावी बालकांची तपासणी रखडत असेल, तर आरोग्य यंत्रणा सलाईनवर असल्याचेच यावरून स्पष्ट होत असल्याचा घणाघात मराठे यांनी केला.
RBSK पथकाने आतापर्यंत किती मुलांची तपासणी केली, किती जणांवर उपचार केले आणि जन्मजात व्याधी किंवा दिव्यांगत्व असलेल्या किती बालकांना पुढील उपचार दिले, या सर्व बाबींची जिल्हा शल्यचिकित्सकांनी सखोल खातरजमा करून कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सर्वसामान्य बालकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या बेफिकीर कारभारात तातडीने सुधारणा न झाल्यास, गावातील बालके आणि पालकांसह ओरोस येथील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासमोर तीव्र उपोषण छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा हेमंत मराठे यांनी दिला आहे.













