डॉ.निमकर्स कोकण नेस्ट रिसॉर्ट येथे भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा झाला

रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे नजिक भगवतीनगर गावातील डॉ.निमकर्स कोकण नेस्ट रिसॉर्ट (by माधवाश्रम प्रा.लि) येथे भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा झाला. भगवतीनगरच्या सरपंच सौ.प्रगती भोसले तसेच कोकण नेस्ट चे संचालक डॉ.चंद्रशेखर निमकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. गृहरक्षक दल महाराष्ट्र शासनाचे प्रशिक्षण अधिकारी राहिलेले श्री भरत जोशी हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिल्यानंतर उपस्थित विद्यार्थी वर्ग व ग्रामस्थांकडून सामुदायिक राष्ट्रगीत म्हटले गेले.देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला,तसेच देशभक्तीपर आणि स्फूर्तीदायक गीतांसोबत जिल्हा परिषद मराठी शाळा निवेंडी खालची शाळेच्या विद्यार्थ्यांनी हातामध्ये तिरंगा फडकवत संचलन केले. श्री भरत जोशी यांच्या शिस्तबद्ध मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कवायतीचे प्रात्यक्षिक सादर केले. यात निवेंडी खालची शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाचा मोलाचा वाटा होता.

 

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील A G Highschool मधील डोळस विद्यार्थ्यांना शिकवणारे एक अंधशिक्षक श्री संजय महाडिक हेही या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित होते. श्री भरत जोशी यांनी लिहिलेल्या ‘भारत देशाचा राष्ट्रध्वज’ या ब्रेल लिपीतील पुस्तकातील तिरंग्या बद्दल माहितीपर उताऱ्याचे वाचन श्री महाडिक यांनी केल्यावर सर्व ग्रामस्थ भारावून गेले. श्री भरत जोशी हे शासनाच्या गृहरक्षक दलाचे प्रशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होते, तसेच ते सर्पमित्रही आहेत. त्यांनी त्यांच्या भाषणात स्वातंत्र दिनाची माहिती व शुभेच्छा दिल्या तसेच डॉक्टर निमकर्स कोकण नेस्ट रिसॉर्टच्या व्यवस्थापनाचे कौतुक देखील केले. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करत असताना भगवती नगरच्या सरपंच सौ. प्रगती भोसले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक तर केलेच तसेच श्री भरत जोशी व श्री संजय महाडिक यांची प्रशंसाही केली.

डॉ.निमकर्स कोकण नेस्ट रिसॉर्ट (by माधवाश्रम प्रा.लि) चे संचालक डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी आपल्या भाषणात या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींचे स्मरण करतानाच स्वातंत्र्याचे महत्व विषद केले. त्यांनी उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच त्यांना सर्व प्रकारची शैक्षणिक मदतीचा पाठिंबा व्यक्त केला. या राष्ट्रीय सणाच्या समारंभात आपल्याला उद्बोधक माहिती देणाऱ्या व संवाद साधणाऱ्या महनीय व्यक्तींना आपण दरवर्षी या ध्वजवंदन कार्यक्रमास आमंत्रित करत असतो असे नमूद केले. डॉ.निमकरांनी 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थ वर्गास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी सौ.गौरी वेलणकर डॉ.निमकर्स कोकण नेस्ट रिसॉर्ट (by माधवाश्रम प्रा.लि) च्या संचालिका यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच या राष्ट्रीय सणाच्या पर्वानिमित्त सर्वांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या सोहळ्यास सरपंच, उपसरपंच यासहित जाणीव फाऊंडेशन चे महेश गर्दे,अवधूत मुळ्ये,ग्रा. पं. सदस्य व कर्मचारी,गणपतीपुळे दूरक्षेत्राचे पोलीस वर्ग,आरोग्य सेविका,अंगणवाडी सेविका,पोलिस पाटील,गावातील ज्येष्ठ नागरिक, विदयार्थी व त्यांचे पालकवर्ग,शिक्षक आणि मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ विशेषत्वाने उपस्थित होते.