बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व पारंपरिक खाद्यसंस्कृतीला उजाळा

स्वप्नील कदम-कुडाळ :      बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथे इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या रानभाज्यांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पावसाळ्यात आढळणाऱ्या विविध रानभाज्यांची ओळख, त्यांचे पौष्टिक व औषधी गुणधर्म तसेच स्थानिक खाद्यसंस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने शाळेच्या वतीने गेली अनेक वर्षे या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे व सौ. शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. यावेळी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, शाळेच्या प्राचार्या चैताली बांदेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी ओमप्रकाश शेटे यांनी रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व, दैनंदिन आहारातील त्यांचा उपयोग आणि पर्यावरणाशी असलेले नाते याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी जागरूकता निर्माण होते, असे सांगत त्यांनी शाळेचे अभिनंदन केले.

 

चेअरमन उमेश गाळवणकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे संशोधनवृत्ती, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि निसर्गप्रेम वाढीस लागते, असे सांगितले. प्राचार्या चैताली बांदेकर यांनी प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण अधिक प्रभावी ठरत असल्याचे नमूद केले.

 

प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्यांची नावे, वैशिष्ट्ये, औषधी गुणधर्म, पौष्टिक मूल्ये व आरोग्यदायी फायदे माहितीफलकांच्या माध्यमातून मांडले. तसेच रानभाज्यांपासून तयार केलेले विविध पारंपरिक व स्वादिष्ट पदार्थही सादर करण्यात आले. उपस्थितांनी पदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व मेहनतीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या आकर्षक सादरीकरणामुळे प्रदर्शन विशेष लक्षवेधी ठरले.