डॉ. अनिकेत निब्रे यांनी साकारली दगडफूलांची ६० फुटी भव्य विठ्ठल मूर्ती
निसर्ग आणि भक्तीचा अनोखा संगम
सावंतवाडी । सचिन रेडकर :
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर अवघा महाराष्ट्र विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेला असताना, निसर्गाच्या कुशीत भक्तीचा एक अत्यंत अलौकिक अन् विलोभनीय अविष्कार पाहायला मिळत आहे. कुडाळ येथील कलासक्त व्यक्तिमत्त्व डॉ. अनिकेत रविंद्र निब्रे यांनी आपल्या शेताच्या मळ्यात साक्षात पंढरीच्या नाथाचे रूप साकारत, ६० फूट उंच अशा भव्य आणि नेत्रदीपक विठ्ठलमूर्तीची निर्मिती केली आहे. निसर्ग आणि भक्तीचा हा अभूतपूर्व संगम पाहून उपस्थित भाविकांचे डोळे तृप्त होत आहेत.
निसर्गरंग अन् भक्तीची सुरेख गुंफण
ही केवळ एक अवाढव्य प्रतिमा नसून, निसर्गातील विविध घटकांचा केलेला एक अप्रतिम अन् सर्जनशील वापर आहे. ओहळातील वेचलेले खडबडीत दगड, पानांची हिरवी नक्षी आणि विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांच्या समृद्ध वैविध्यतेतून ही ६० फुटी विठ्ठलमूर्ती आकारास आली आहे. या वर्षीच्या निर्मितीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीला परिधान केलेले मनमोहक आणि पारंपरिक वस्त्रालंकार! फुलांच्या आणि पानांच्या सहाय्याने तयार केलेल्या या आकर्षक अलंकारांमुळे विठुरायाचे सौंदर्य अधिकच खुलले असून, पाहणाऱ्याचा माथा श्रद्धेने आपोआप झुकत आहे.
सलग आठ दिवसांची अखंड कला-साधना
या भक्तीमय अन् अलौकिक निर्मितीमागे अहोरात्र घेतलेली कष्टाची आणि निष्ठेची साधना आहे. डॉ. अनिकेत निब्रे आणि त्यांचे स्नेही चिरायू वारंग यांनी सलग आठ दिवस अथक परिश्रम घेऊन ही भव्य कलाकृती पूर्ण केली. या सृजनशील प्रवासात त्यांना रविंद्र निब्रे, ऋतिका निब्रे, प्रशम वारंग आणि अनिशा वारंग यांचे मोलाचे आणि मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून आणि विठ्ठलचरणी असलेल्या दृढ श्रद्धेतूनच ही नयनरम्य प्रतिमा पूर्णत्वास जाऊ शकली.
आषाढीच्या मुहूर्तावर साकारलेली ही फुला-दगडांची महाकाय विठ्ठलमूर्ती सध्या संपूर्ण पंचक्रोशीत प्रचंड कौतुकाचा आणि श्रद्धेचा विषय बनली आहे. निसर्गाच्या कुशीत अवतरलेले हे विठूरायाचे लोभस रूप डोळ्यांत साठवण्यासाठी आणि या भक्तीमय दृश्याचा अनुभव घेण्यासाठी भाविकांची व ग्रामस्थांची रीघ लागत आहे.













