देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी कलेतून जपली विठ्ठल भक्ती

देवरूख (प्रतिनिधी):

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार श्री. विलास विजय रहाटे यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विठ्ठल भक्ती अनोख्या पद्धतीने जपण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. विठ्ठल भक्तीच्या आस्था व निष्ठेपायी त्यांनी आषाढ महिन्यात सावळ्या विठ्ठल रूपाच्या अनेक मनमोहक रांगोळ्या साकारल्या आहेत.

आषाढी एकादशीच्या भक्तीने बहरलेल्या वातावरणात श्री. विलास रहाटे यांनी नदीकाठच्या मऊ मातीपासून छोटीशी वीट तयार करून, ती भाजून पक्की केली. नंतर त्या विटेवर केवळ एका तासाभरात साक्षात श्री पांडुरंगाची प्रतिमा रांगोळीने कलात्मक पद्धतीने साकारली आहे. हि विटेवरील रांगोळी पाहून शब्द उमटतात. कलेला लाभला भक्तीचा स्पर्श, विटेवरी अवतरला माझा पांडुरंग. यापूर्वीच्या आषाढी एकादशीला श्री. विलास रहाटे यांनी तुळशीच्या पानावर विठ्ठल, मोरपीसावर विठ्ठल, पाण्याखाली विठ्ठलाची रांगोळी साकारून कलाप्रेमींची मने जिंकली होती. तिच परंपरा श्री. विलास रहाटे यांनी पुढे सुरू ठेवल्याबद्दल सर्वस्तरातून कौतूक होत आहे.