नगरसेविका सौ. शर्वरी धारगळकर व शेखर धारगळकर दांपत्याला महापूजेचा मान 
सावंतवाडी । प्रतिनिधी : आषाढी महाएकादशीच्या पावन पर्वावर सावंतवाडीतील प्रसिद्ध ‘प्रतिपंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देव विठ्ठल-रखुमाई मंदिरात भक्तीचा अथांग सागर लोटला होता. पहाटेच्या मंगलमय वातावरणात पार पडलेला दुग्धाभिषेक, काकड आरती आणि भावपूर्ण महापूजेनंतर श्रींच्या दर्शनाची कवाडे भक्तांसाठी खुली करण्यात आली. ‘माउली’च्या दर्शनासाठी पहाटेपासूनच शेकडो वैष्णवांनी मंदिरात अलोट गर्दी केली होती.
दिनक्रमाची सुरुवात अत्यंत धार्मिक वातावरणात झाली. यंदाच्या महापूजेचा आणि आरतीचा पावन मान श्री. शेखर धारगळकर व नगरसेविका सौ. शर्वरी धारगळकर या दांपत्याला मिळाला. पूजाविधीनंतर परिसर विठ्ठलनामाच्या जयघोषाने निनादला.
उत्सवाचे औचित्य साधून दिवसभर विविध भक्तीरसपूर्ण आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल आयोजित करण्यात आली आहे. यात सकाळी श्री सद्गुरु संगीत विद्यालयाच्या बाल-गोपाळ व साधकांनी सादर केलेल्या सुश्राव्य भक्तीसंगीताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यानंतर दुपारी श्री कालिका देवी भजनी मंडळ (कारिवडे) यांचा टाळ-मृदुंगाच्या गजरातील भजन सोहळा आणि सावंतवाडी महिला मंडळाचे भजन रंगणार आहे. सायंकाळी श्री. योगेश बोरचाटे (माणगाव) यांचे सुश्राव्य भक्तीगायन भाविकांना भक्तीरसात चिंब भिजवणार आहे.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे कुरोली सिद्धेश्वर (जि. सातारा) येथील ख्यातनाम कीर्तनकार, ‘कीर्तनभूषण’ ह.भ.प. विलासबुवा गरवारे यांचे प्रबोधनात्मक व रसाळ कीर्तन रंगणार आहे.
टाळ-मृदुंगाचा गजर, तुळशीवृंदावन डोईवर घेतलेल्या विठ्ठलभक्तांची मांदियाळी आणि भक्तीसंगीताच्या सुरावलींनी प्रतिपंढरी सावंतवाडी नगरी पूर्णतः विठ्ठलमय आणि दुमदुमून गेली आहे.










