सावंतवाडी |प्रतिनिधी :वर्गखोलीतील शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शेतीची ओळख करून देण्यासाठी राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या वतीने “बांधावरची शाळा” हा अभिनव शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेतात जाऊन विविध शेतीकामांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना भातशेतीचे महत्त्व, पारंपरिक शेतीपद्धती, शेतीतील विविध कामे तसेच निसर्गाशी असलेले घट्ट नाते यांची सविस्तर माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष शेतात फिरून निरीक्षण करताना विद्यार्थ्यांनी शेतीतील बारकावे जाणून घेतले.
यावेळी शिक्षिका रेश्मा तोंडवळकर, पुनम कोचरेकर, हरीश सावंत यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांचे कष्ट, शेतीचे सामाजिक आणि आर्थिक महत्त्व तसेच पर्यावरण संवर्धनाची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले.
अनुभवाधारित शिक्षणाला चालना देणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण झाली असून पालक आणि ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील ज्ञानासोबतच प्रत्यक्ष जीवनातील अनुभव मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.











